नरेंद्र मोदी यांना शरद पवार चालू शकतात, मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का चालू शकत नाहीत, असा रोकडा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
नोटबंदीनंतर केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. या मुद्दयावरून दररोज विविध पक्षांकडून मोदी सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेली शिवसेनाही विरोधकांच्या सुरात सूर मिसळताना दिसत आहे. केंद्राने पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह शिवसेना नेत्यांचाही समावेश असेल. आतापर्यंत भाजपवर केवळ शाब्दिक कुरघोडी करणाऱ्या शिवसेनेने केंद्रात घेतलेल्या या सरकारविरोधी भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याबद्दल उद्धव ठाकरे यांना विचारले असता, मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा प्रतिसवाल उद्धव यांनी विचारला.
आम्ही मोदींच्या विरोधात नाही, मात्र हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो, असे उद्धव यांनी म्हटले.

बारामती येथील भेट आणि पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या कार्यक्रमात मोदी यांनी पवार यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. या कार्यक्रमात पवार यांनी मला शेतीतील काही गोष्टी बोट धरून शिकविल्या, असे सांगत मोदी म्हणाले, त्यांच्या संसदीय कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाला मी मनापासून शुभेच्छा देतो. सलग ५० वर्षे ते जनतेमधून निवडून येत आहेत ही सोपी गोष्ट नाही. राजकारणाच्या धकाधकीमध्ये असतानाही शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शरदराव सतत पुढे येत असतात. युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीचाही रौप्यमहोत्सव सुरू आहे. त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी महापालिकेपासून सुरुवात करून आता ते लहान वयात २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. शरदराव यांची गोष्ट वेगळी आहे. आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी ५० वर्षे काम केले आहे.

पंतप्रधानांनी येथे येण्यास आवर्जून वेळ काढला याचे मला कौतुक वाटते, असे सांगून शरद पवार म्हणाले, मोदी शनिवारी जपानमध्ये होते. आज सकाळी गोव्यात होते. दुपारी बेळगावलाही ते जाऊन आले. आता येथील कार्यक्रमानंतर ते कोठे जाणार हे माहिती नाही. मात्र या सगळ्यातून मोदींच्या देशाप्रती असलेल्या समर्पित वृत्तीची जाणीव होते.