एका जपानी कंपनीची सध्या मुंबईतील रियल इस्टेट क्षेत्रात चांगलीच चर्चा आहे. त्यासाठी कारणही तसेच आहे. जपानमधील सुमिटोमो या कंपनीने मुंबईतील मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मधील तीन एकर जमिनीसाठी विक्रमी रकमेची ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकली तर तुमचेही डोळे फिरतील. बीकेसीमधील तीन एकर जमीन या कंपनीने २ हजार २३८ कोटींना विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. म्हणजेच एक एकर जमिनीसाठी कंपनी चक्क ७४५ कोटी रुपये मोजण्यास तयार आहे. हा व्यवहार झाला तर देशातील जमिनीचा हा सर्वात महागडा व्यवहार ठरेल. यासंदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित जमीन विकत घेण्यासाठी केवळ सुमिटोमो कंपनीने बोली लावली आहे. या बोलीसंदर्भातील प्रक्रिया सध्या सुरु असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. बीकेसीमधील जिओ गार्डनच्या बाजूला असणारा ही जमीन मागील अनेक महिन्यांपासून विक्रीसाठी उपलब्ध होती. मात्र रियल इस्टेट बाजारात सध्या उत्साहाचे वातावरण नसल्याने ही जमीन विकत घेण्यासाठी कोणत्याही स्थानिक विकासकाने रस दाखवला नाही. ‘सुमिटोमोने लावलेली बोली ही बाजारभावापेक्षा खूपच जास्त आहे. मात्र त्यांनी लावलेल्या बोलीवरुन त्यांना बीकेसीसारख्या मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या जागेवर कार्यालय उभारण्यात रस असल्याचे दिसून येत आहे’ असं मत रियल इस्टेटसंदर्भातील एका तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या भागातील सध्याचा बाजारभाव ३ लाख ४४ हजार रुपये प्रती स्वेअर मीटर इतकी आहे.

याआधी २०१० साली लोढा ग्रुपने एमएमआरडीच्या वडाळा येथील ६.२ एकर जमीनीसाठी ४ हजार ५० कोटी रुपये किंमत मोजली होती. म्हणजेच लोढाने एक एकर जमीनीसाठी ६५३ कोटी रुपये मोजले. मात्र हे पैसे कंपनीने पाच वर्षांच्या कालावधीमध्ये दिले होते.

या खरेदीमागे भारत आणि जपानमधील उद्योग तसेच गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही देशातील सरकाराकडून केले जात आहेत. सुमिटोमो ही जपानमधील सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असल्याने त्यांनी या संधीचा फायदा घेत भारतामध्ये आपली गुंतवणूक वाढवण्याचा विचार केल्याने ही बोली लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बीकेसीमध्ये ३०० इमारती असून १९८० च्या दशकाच्या मध्यातून येथे कंपन्यांनी आपली कॉर्पोरेट ऑफिसेस बांधण्यास सुरुवात केली. १९७७ साली सरकारने नरीमन पॉइण्ट आणि दक्षिण मुंबईत झालेली कार्यलयांची गर्दी कमी करण्यासाठी बीकेसीमध्ये कॉर्पोरेट हब निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.

सुमिटोमो उद्योग समुहाबद्दल

सुमिटोमो कंपनीच्या मालकीच्या सुमिटोमो मित्सुई फायनान्स ग्रुप, एनईसी कॉर्पोरेश अॅण्ड निपॉन स्टील कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत. माझदा मोटर्स ही कंपनीही सुमिटोमोच्याच मालकीची आहे. सुमिटोमोचे व्यवसाय जपानबरोबर अनेक आशियाई तसेच आखाती आणि युरोपीय देशांमध्ये आहेत. याशिवाय उत्तर अेरिका, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतही या कंपनीची गुंतवणूक आहे. १९१९ साली सुमिटोमोची स्थापना झाली असून नुकताच त्यांनी आपला १०० वा वर्धापन दिन साजरा केला. धातू उत्पादन, दळणवळण आणि बांधकाम, पायाभूत सुविधा, प्रसारमाध्यमे, डिजिटल प्रसारमाध्यमे, खाणकाम, रसायन उद्योग, रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये कंपनी काम करते.