जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने (एनटीए) एप्रिलमध्ये घेतलेल्या जेईई मुख्य परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला. जानेवारी आणि एप्रिल या दोन्ही परीक्षांमध्ये मिळून देशभरातील २४ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाईल मिळवले आहेत.

यंदा पहिल्यांदाच ‘एनटीए’च्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहेत. जेईई मुख्य परीक्षा जानेवारी आणि एप्रिल अशी दोनवेळा घेण्यात आली. एप्रिलमध्ये १४ ते १६ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल सोमवारी रात्री जाहीर झाला. जानेवारी आणि एप्रिल अशा दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून २४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेटाईल मिळवले आहेत. जानेवारीमधील परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाईल मिळवले होते. एप्रिलमधील परीक्षेत मात्र राज्यातील एकाही विद्यार्थ्यांला शंभर पर्सेटाईल मिळालेले नाहीत. त्यामुळे पुण्यातील राज अगरवाल, अंकितकुमार मिश्रा, कार्तिकेय गुप्ता हे जानेवारीच्या परीक्षेतील यशवंतच राज्यात पहिले आले आहेत. जेईई मेन्स या परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी, एनआयटी यांसारख्या संस्थांमधील अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठीचे विद्यार्थी निवडण्यात येतात. मेन्समधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅडव्हान्स परीक्षा द्यावी लागते. अ‍ॅडव्हान्समधील गुणांनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतात. यातील ज्या परीक्षेत अधिक गुण असतील त्याचा विचार पुढील परीक्षेसाठी करण्यात येणार आहे. जानेवारी आणि एप्रिल अशा दोन्ही परीक्षांमधून सर्वोत्तम गुण मिळालेले साधारण २ लाख २४ हजार विद्यार्थी अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरतील.

यंदा या परीक्षेसाठी देशभरातून ८ लाख ८१ हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ६ लाख ८ हजार ४४० विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. दोन परीक्षा घेण्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचे दिसत असून २ लाख ९७ हजार ९३२ विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत. देशभरातील १०० पर्सेटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राजस्थान व तेलंगणातील प्रत्येकी ४, महाराष्ट्र, मध्य प्रदेशमधील ३, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणामधील प्रत्येकी २, झारखंड, पंजाब, कर्नाटक, दिल्ली येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकाल http://www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

कट ऑफ पर्सेटाईल

खुला गट (८९.७५),

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल (७८.२१), इतर मागासवर्गीय (७४.३१), अनुसूचित जाती (५४.०१), अनुसूचित जमाती (४४.३३)