संवेदनशील लेखिका, कवियत्री एवढीच कविता महाजन यांची ओळख मर्यादीत नव्हती. त्या समाजजीवनाच्याही उत्तम अभ्यासक होत्या. आपल्या लेखणीतून त्यांनी स्त्रीयाच्या विविध प्रश्नांना नेहमीच वाचा फोडली. लेखन करत असतानाच त्यांनी समाजकार्यही तितक्याच तळमळीने केले. आदिवासी समाजजीवनाचा त्यांना दांडगा अभ्यास होता. ठाणे जिल्ह्यात आदिवासी पाडयात त्यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले होते. आदिवासी समाजाचे विविध समस्या, प्रश्न त्यांनी नेहमीच आपल्या लेखणीतून मांडले. त्यामुळे अशा संवेदनशील व्यक्तीच्या निधनाने फक्त साहित्य विश्वाचेच नव्हे समाजाचेही मोठे नुकसान झाले आहे.

कविता महाजन मागच्या काही दिवसांपासून न्यूमोनियाने त्रस्त होत्या. निधन होण्याच्या पाच दिवस आधी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमधून त्यांनी होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली होती. पण त्या अवस्थेतही त्यांची काम करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. कामं आपली वाटपाहाताहेत असे त्यांनी लिहिले होते. त्यातून त्यांची काम करण्याची तळमळ दिसून येते.

ब्र, भिन्न आणि कुहू या कादंबऱ्या ही त्यांची विशेष ओळख होती. साहित्य अकादमी पुरस्काराच्या त्या मानकरी होत्या. न्यूमोनियामुळे श्वासोश्वास करताना त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर पुण्यातील चेलाराम रुग्णालयात वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मागे मुलगी, वडिल असा परिवार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ सप्टेंबर १९६७ रोजी त्यांचा नांदेड येथे जन्म झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य विषयात एम.ए. केले होते.