गर्दीच्या वेळेत तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढताना प्रवाशांची होणारी ससेहोलपट थांबण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला असला तरी अद्याप मध्य रेल्वे स्थानकांवर तब्बल १२० तिकीट खिडक्यांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. याशिवाय तिकीट खिडक्याच उपलब्ध नसल्याने सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचाही तुटवडा असल्याने रेल्वेचे तिकीट मिळवताना प्रवाशांची गैरसोय होत आहे.
उपनगरीय रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तिकीट मिळवताना प्रवाशांना बऱ्याच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. याच धर्तीवर रेल्वेने मोबाइल तिकीट, एटीव्हीएम आणि जेटीबीएस आदी पर्याय उपलब्ध करून दिले. यामुळे चार लाख प्रवाशांना दिलासा मिळाला. मात्र अद्यापही दादर, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, ठाणे, डोंबिवली, घाटकोपर, कल्याण आदी स्थानकांवर तिकीट खिडक्यांच्या कमतरतांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या मध्य रेल्वेवर दिवसभरात ४२ लाख प्रवासी प्रवास करतात. यात रोज सहा लाख प्रवासी तिकीट खिडक्यांवरून तिकीट काढतात. मात्र रेल्वेच्या नियमानुसार या प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे स्थानकांवर ९५० तिकीट खिडक्यांची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात ८४० तिकीट खिडक्या उपलब्ध असल्याने प्रवाशांची तिकीट मिळवताना गैरसोय होत असते. तर दुसरीकडे तिकीट खिडक्यांवर १७०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना १४०० कर्मचारी कार्यरत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.