आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला घेऊन घराच्या गच्चीतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आणि तो फसल्यावर चाकूने भोसकून त्याची हत्या करणाऱ्या महिलेला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केले.
पुणे येथील रहिवासी सविता भोसले या २१ वर्षांच्या विवाहितेनेच क्रूरपणे आपल्या बाळाची हत्या केल्याचे सिद्ध होत असल्याचे नमूद करीत खंडपीठाने तिच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे सविताने आपल्या पतीनेच आपल्याला गोवल्याचा युक्तिवाद आपल्या बचावार्थ केला होता. मात्र न्यायालयाने तिचा हा युक्तिवाद फेटाळून लावला.
सविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाळाच्या शेजारी झोपल्याचा आणि तिच्यापासून काहीच अंतरावर सविताची आईही झोपली असल्याचा पुरावा पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. त्याचा दाखला देत न्यायालयाने तिचा युक्तिवाद फेटाळून लावला. या पुराव्यावरून पतीने सविताला आणि बाळाला गच्चीत नेले आणि तेथून आधी तिला व नंतर बाळाला फेकून दिल्याचे म्हणणे विसंगत वाटते, असेही न्यायालयाने नमूद केले. सविताचा दावा ग्राह्य मानला तर घटनेच्या वेळी तिच्यापासून काहीच अंतरावर झोपलेली तिची आई तिच्या रडण्याने उठली असती आणि तिने मदतीसाठी धावा केला असता. परंतु सविताच्या आईने आपल्या जबाबात असे काहीही म्हटलेले नाही. उलट तिने साक्ष फिरवली, याकडेही न्यायालयाने निकालात लक्ष वेधले आहे.