डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला वेगळी दिशा

मुंबईत २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे दुसऱ्या दिवशी लक्षात आले.  एल्फिन्स्टन जंक्शन परिसरातील भुयारी गटारद्वार (मॅनहोल) उघडे असल्यामुळे अमरापूरकर त्यात पडले. वरळी समुद्रकिनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे कल्लोळ उडाला. भुयारी गटारद्वार उघडेच ठेवल्याबद्दल पालिकेवर ताशेरे ओढण्यात आले.  पालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र आता एल्फिन्स्टन जंक्शन परिसरातील सनमिल कम्पाऊंडच्या आसपास काही स्थानिक कार्यकर्ते साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून भुयारी गटारद्वारे उघडत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पालिकेच्या हाती लागले आहे. साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा या उद्देशाने या मंडळींनी ही झाकणे उघडली असली तरी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपरोक्ष ते करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत एल्फिन्स्टन जंक्शन आणि आसपासच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यास सुरुवात केली . २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एल्फिन्स्टन जंक्शनजवळील सनमिल कम्पाऊंड आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे काही स्थानिक कार्यकर्ते सनमिल कम्पाऊंड परिसरातील भुयारी गटारद्वारे उघडत असल्याचे छायाचित्रण सीसी टीव्हीत आहे. पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेऱ्यामधील छायाचित्रणात काही व्यक्ती  गटाराची झाकणे उघडत असल्याचे निदर्शनास आल्याची बाब पालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे हे छायाचित्रण पालिकेला मिळावे यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चार-पाच दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीसाठी हे उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांना केलेल्या पत्रव्यवहारानंतर हे छायाचित्रण पोलिसांकडून पालिकेच्या ताब्यात आल्याचे समजते.

अहवाल लवकरच

डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी येथे समुद्रकिनाऱ्यावर सापडल्यानंतर पालिकेवर टीका झाली होती. न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डॉ. अमरापूरकर दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना दिले. या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विजय सिंघल आपला अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.