मुंबईत १९ व २० मे रोजी कार्यशाळा; अश्विनी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन
दहावी-बारावीनंतरच नव्हे तर पदवीनंतर काय याचे खात्रीशीर आणि समाधानकारक उत्तर करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच मिळावे यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे १९ आणि २० मे रोजी ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्याची जिल्हाधिकारीपदाची कारकीर्द यशस्वीपणे गाजविलेल्या आणि सध्या मुंबईच्या (शहर) जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सनदी अधिकारी अश्विनी जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कार्यशाळा होणार आहे.
कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखांची मळलेली वाट चोखाळायची की कुणी तरी सुचविले म्हणून व्यावसायिक पदवी, पदविका अभ्यासक्रमांच्या वाटय़ाला जायचे, हा प्रश्न करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात कायम भुंगा घालत असतो. कित्येकदा पदवीनंतरच्या पर्यायांचीही माहिती नसल्याने विद्यार्थी गोंधळून गेलेले असतात. असा विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध टप्प्यांवरील पर्यायांची माहिती ‘मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत करून देण्यात येईल. यात दहावी-बारावीच्या आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य, ललित कला या शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ करिअर समुपदेशक करून देतील.
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी आणि विद्यालंकार क्लासेस, हिंदू कॉलनी येथे तसेच शनिवार आणि रविवार वगळता ‘लोकसत्ता’च्या नरिमन पॉइंट येथील कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मिळतील. पन्नास रुपये इतके प्रवेशिकेचे शुल्क आहे.
विषय आणि वक्ते
१) क-कलचाचणीचा आणि करिअरचाही – दीपाली दिवेकर, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
२) कला क्षेत्रातील वळणवाटा – नीता खोत, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
३) वाणिज्यमधील करिअर व्यवहार – सुरेश जंगले, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
४) ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
५) विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक;
अॅमिटी युनिव्हर्सिटीने प्रेझेंट केलेल्या व विद्यालंकार क्लासेसच्या सहकार्याने होत असलेल्या आणि सपोर्टेड बाय युक्ती तसेच पॉवर्ड बाय गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन, अरेना अॅनिमेशन एन.ए.एम.एस. शिप मॅनेजमेंट प्रा. लि., सास्मिरा, एज्यू ऑप्शन्स जर्मनी आणि एलटीए स्कूल ऑफ ब्यूटी आदींच्या विद्यमाने होत असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’चे ‘नॉलेज पार्टनर’ ‘आयटीएम’ हे आहेत.