पादचाऱ्यांनाही मज्जाव; अन्य पुलांच्या दुरुस्तीबाबतही चाचपणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : अंधेरी दुर्घटनेनंतरच्या पाहणीत रेल्वे रूळांवरून गेलेल्या लोअर परळसह एकूण सहा उड्डाणपुलांची तातडीने पुनर्बाधणी किंवा दुरुस्तीची गरज आहे, असा निष्कर्ष पुढे आला. त्यापैकी लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या पुनर्बाधणी, दुरुस्तीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वे, महापालिकेने केलेल्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी या पुलावरील वाहतूक २४ जुलैच्या पहाटे सहा वाजल्यापासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पादचाऱ्यांनाही पुलाचा वापर करता येणार नाही.

अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वेने महापालिका अधिकारी आणि आयआयटीतील तज्ज्ञ मंडळींना सोबत घेत हद्दीतल्या उड्डाणपुलांसह पादचारी पुलांची पाहणी सुरू केली. १७ जुलैला डिलाईल पुलाची पाहणी होती. त्यावेळी  वापर, रचना, सांगाडा आदी बाबी लक्षात घेत हा पूल तातडीने पाडून नव्याने बांधावा किंवा दुरूस्ती हाती घ्यावी, असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार केला. वाहतूक पोलीस दलाचे उपायुक्त अशोक दुधे यांनी २४ जुलै रोजी पहाटे सहा वाजल्यापासून वाहतूक, पादचारी वापरासाठी पूल बंद राहील, असा आदेश दिला. दरम्यान, सोमवारी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील विभागीय मुख्यालयात या पुलाची नवी रचना, आराखडा किंवा दुरूस्ती याबाबत चर्चा होणार आहे.

ग्रॅंट रोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि दादरच्या टिळक पुलाच्या पुनर्बाधणी किंवा दुरुस्तीची गरज असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lower parel flyover closed for traffic from tomorrow
First published on: 23-07-2018 at 04:07 IST