शिवसेनेची ५७ जागांवर राष्ट्रवादीशी लढत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकहाती प्रचाराचा धडका लावल्यामुळे महायुती सत्तेवर येण्याची खात्री असूनही शिवसेना चिंतित आहे. शिवसेनेचे १२४ पैकी सर्वाधिक ५७ उमेदवार हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी लढत देत असल्याने त्याचा फटका आपल्या संख्याबळाला तर बसणार नाही ना अशी चिंता शिवसेनेला सतावत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या सत्ताधारी युतीला धारेवर धरण्यात विरोधक कमी पडले असे चित्र दिसले. काँग्रेस हा मोठा पक्ष असूनही महाराष्ट्रव्यापी प्रचारात काँग्रेस अपयशी ठरली. पक्षाचे सर्व नेते आपापल्या भागातच अडकल्याचे दिसून आले. विरोधकांची उणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भरून काढली. त्यांनी प्रचाराचा धडाका लावत सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. पवारांच्या या प्रचार धडाक्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा राजकीय लाभ होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेने १२४ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यापैकी सर्वाधिक ५७ जागांवर सेना-राष्ट्रवादीचे उमेदवार आमनेसामने आहेत. तर ५२ जागांवर सेना-काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत आहे. १५ जागांवर मनसे व इतर पक्षाच्या उमेदवारांसह सेनेच्या उमेदवारांची लढत आहे.

कोल्हापुरातील कागल मतदारसंघात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेनेचे संजय घाटगे रिंगणात आहेत. त्यात भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी बंडखोरी केली आहे.  करमाळ्यात शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलत रश्मी बागल यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी ताकद लावली आहे. शिवाय नारायण पाटील यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेला फटका बसण्याची चिन्हे आहेत. साताऱ्यात पाटणमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभुराजे देसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांच्यात लढत होत आहे. मुंबईतील अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक आणि शिवसेनेचे तुकाराम काते यांच्यात चुरशीची लढत होत आहे. ठाण्यात शहापूरमध्ये सेनेचे पांडुरंग बरोरा व राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांच्यात लढत होत आहे. सांगोलामध्ये शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आपली ताकद शेकापच्या पाठीशी उभी केली आहे.

साखर पट्टय़ात ताकद

पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये आणि मराठवाडय़ात राष्ट्रवादीची चांगली ताकद असून या दोन्ही भागांत राष्ट्रवादी व शिवसेनेत अनेक जागांवर चुरशीची लढत होत आहे. शरद पवार यांच्या आक्रमक प्रचारामुळे राष्ट्रवादीपासून दुरावलेले मतदार हे पुन्हा पक्षाकडे ओढले जातील अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीला फायदा झाल्यास शिवसेनेला नुकसान होणार हे स्पष्ट आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election sharad pawar campaign make shiv sena nervous zws
First published on: 23-10-2019 at 04:16 IST