अवघ्या दोन दिवसांत २२१ निर्णय ‘मार्गस्थ’

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते या धास्तीने गतिमान झालेल्या राज्य सरकारने अवघ्या दोन दिवसांत तब्बल २२१ शासन निर्णय ‘मार्गस्थ’ करून मतदारराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक बाबींशी सबंधित  निर्णयाचा समावेश असला तरी सर्वाधिक निर्णय हे विविध विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून गेल्या काही दिवसांत मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी वाढली होती. मंत्रालयात दररोज हजारोंच्या संख्येने लोक येत होते. यामध्ये प्रामुख्याने बदल्यांसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांचीच संख्या अधिक होती. त्याचप्रमाणे मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी आग्रह धरणाऱ्या लोकप्रतिनिधींची उपस्थितीही लक्षणीय होती. गेले दोन आठवडे महानजादेश यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री मुंबईबाहेर असले तरी प्रशासन मात्र कामाला लागले होते. त्यातही महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पशुसंवर्धन, नगरविकास, सहकार, गृहनिर्माण, आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय या विभागांत लोकांची कामे मार्गी लावण्यासाठी एकच धावपळ सुरू होती.

कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊ शकते या धास्तीने रात्रंदिवस काम करणाऱ्या प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत तब्बल २२१ जनहिताचे निर्णय ‘मार्गस्थ’ करीत मतदारराजाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता, महाराष्ट्र गहनिर्माण विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात वाढ, ठाणे महापालिकेतील सुमारे ६०० नवीन पदांची निर्मिती, सानुग्रह अनुदान, नवीन प्रकल्प, योजनांच्या अंमलबजावणीस मान्यता यासोबतच विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निर्णयांचा भरणा अधिक आहे.

प्रामुख्याने कृषी, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम विभागातील बदल्या, पाणीपुरवठा योजनांना मान्यता तसेच ग्रामविकास विभागाने राज्यातील अनेक रस्त्यांच्या दर्जा उन्नतीस दिलेल्या मान्यतेच्या निर्णयांचा समावेश आहे.