रेल्वेचे रुळ ओलांडू नका एका प्लॅटफॉर्म वरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पूलाचा वापर करा, अशी उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर सतत केली जाते. तरीही अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना दिसतात. अनेकदा जीव धोक्यात टाकणाऱ्या अशा प्रवाश्यांना रेल्वे पोलिसांकडून दंड केला जातो. पोलिसांनी अनेकदा कारवाई केली तर रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत नाही. अनेकदा अशाप्रकारे रेल्वे रुळ ओलांडणे धोक्याचे ठरु शकते. असाच धोका आसनगाव स्थानकात एका रेल्वे प्रवाशाच्या जीवावर बेतला असता. मात्र प्रसंगावधान दाखवल्याने या प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. या थरारक प्रसंगाचे चित्रिकरण तेथे उपस्थित दुसऱ्या प्रवाश्याने केले असून हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्लॅटफॉर्मच्या बाजूने एक एक्सप्रेस ट्रेन सुसाट वेगाने जाताना दिसते. ही गाडी सुसाट वेगाने प्लॅटफॉर्मवरुन निघून गेल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील लोक खाली रुळांकडे वाकून बघतात. त्यावेळी पलाट आणि रुळांमधील अंतरामध्ये असणाऱ्या जागेतून एक व्यक्ती बाहेर येत रुळांवरुन चालू लागते. रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रुळावर उतरलेल्या या व्यक्तीला समोरुन येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनच्या वेगाचा अंदाज आला नाही त्यामुळे तो आपला जीव वाचवण्यासाठी प्लॅटफॉर्म आणि रुळांच्या मधल्या जागेत अंग चोरुन बसला. एक्सप्रेस ट्रेन गेल्यानंतर तो उभा राहून काहीच न झाल्यासारखा चालू लागल्याचेही या व्हिडिओत दिसत आहे. मात्र व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने ‘आई शपथ’ आश्चर्यचकित होऊन अशी प्रतिक्रिया दिल्याचे ऐकू येते. तुम्हीच पाहा हा व्हायरल व्हिडिओ…

 

व्हिडिओतील व्यक्ती कोण आहे याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र हा प्रकार मंगळवारी २५ जून रोजी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी घडला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी एक्सप्रेस ट्रेन ही काशी एक्सप्रेस असून ती प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन मुंबईच्या दिशेने जात होती अशी माहिती समोर आली आहे. देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात त्याप्रमाणे नशिब बलवत्तर असल्याने या व्यक्तीचे प्राण वाचले. मात्र अशाप्रकारे रेल्वे रुळ ओलांडणे जीवघेणे ठरु शकते म्हणूनच रेल्वे स्थानकामध्ये एका प्लॅटफॉर्म वरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचाच वापर करावा अशी जागृती रेल्वे मार्फत केली जाते.