30 September 2020

News Flash

..आणि मंत्रालयातील माणुसकी जिवंत झाली!

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी एक लाख रुपये

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

समाजमाध्यमावरील आगळ्या चळवळीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद; अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरूणाला उपचारासाठी एक लाख रुपये

गेल्या महिन्याच्या २० तारखेची घटना. नुकताच विवाह झालेला अमोल काळे नावाचा तरुण आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून बार्शी तालुक्यातील कोरफळे गावातून बार्शीला जात असताना हरणांचा कळप अचानक आडवा आला आणि अमोलच्या दुचाकीच्या धडकेने एका हरणाचा मृत्यू झाला.. पण त्याच अपघातात अमोल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले आणि समाजमाध्यमावर एका अनोख्या चळवळीने जन्म घेतला. हे माध्यम गांभीर्याने वापरले, तर समाजातून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो याची साक्ष पटली. ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटसअॅप’च्या माध्यमातून अमोलच्या उपचारासाठी निधी जमविण्यासाठी कोरफळ्यातीलच महेश निंबाळकरने पुढाकार घेतला, मदतीचा ओघ सुरू झाला आणि या चळवळीची दखल घेऊन आज मुख्यमंत्री निधीतून अमोलच्या उपचारासाठी एक लाखांचा धनादेशही निघाला..

अमोल काळे हा कायद्याचे शिक्षण घेणारा पारधी समाजातील तरुण. गेल्या ११ जून रोजी त्याचा विवाह झाला आणि २० जूनला या अपघातात महेशच्या मेंदूला जबर इजा झाली. सोलापूरच्या गंगामाई इस्पितळात अमोलवरील शस्त्रक्रियेसाठी दोन-तीन लाखांचा खर्च येणार होता. शिवाय दररोजचा आठ-दहा हजारांचा खर्चदेखील अटळ होता आणि कुटुंबाच्या हातात छदामही नव्हता.

दररोजच्या जगण्याचा संघर्ष सहजपणे स्वीकारणारे अमोल काळेचे कुटुंब हा आघात कसा सोसणार, या चिंतेने  महेश निंबाळकर अस्वस्थ झाला. कोरफळे येथे उपेक्षित मुलांसाठी ‘स्नेहग्राम’ नावाची संस्था चालविणाऱ्या महेशने पुढाकार घेतला आणि ‘सृजन व्हिलेज’ या व्हॉटसअॅप ग्रुपवर व त्याच्या फेसबुकवरून त्याने मदतीचे आवाहन केले. लगोलग राज्याच्या कानाकोपऱ्यातून माणुसकीचे असंख्य झरे जिवंतही झाले, पण अमोलच्या उपचाराच्या खर्चाची जुळवाजुळव होत नव्हती. दर दिवसागणिक फेसबुक आणि व्हॉटसअॅपवरून अमोलच्या प्रकृतीची माहिती आणि उपचारासाठी दात्यांकडून जमा होणाऱ्या निधीचा तपशील महेश देत होता.

कोणत्याही स्थितीत पैशाअभावी या तरुणावरील उपचारात कोणताही खंड पडणार नाही असा पणच स्नेहग्रामने आणि सृजन व्हिलेजने केला होता. नजरेसमोर एकच ध्येय होते, अमोलला वाचविणे आणि विवाहानंतर जेमतेम दहा दिवसांतच या कुटुंबावर ओढवलेल्या आपत्तीतून त्याला बाहेर काढणे!..

अमोलची मृत्यूशी झुंज सुरू असतानाच, माणुसकी जिवंत असल्याचा याचा नवनवा प्रत्यय सृजन व्हिलेजला दररोज येतच होता. अमोलच्या आईच्या खात्यावर दररोज लहानमोठय़ा रकमा जमा होत होत्या आणि वेदनेने काळवंडलेल्या त्या मातेच्या चेहऱ्यावर त्याही स्थितीत माणुसकीच्या प्रत्ययाने समाधानाची छटादेखील उमटत होती

.. माहिती महाजालावरील एका पोर्टलनेही अमोलच्या अपघाताचे आणि त्याला वाचविण्यासाठी सुरू झालेल्या आगळ्या चळवळीचे वृत्त जगभर पोहोचविले, स्थानिक वृत्तपत्रांनीही या चळवळीची कौतुकाने दखल घेतली आणि चळवळीची माहिती मंत्रालयात, मुख्यमंत्र्यांच्या कार्यलयापर्यंत पोहोचली. मंत्रालयातील माणुसकी जागी झाली.. मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे ओमप्रकाश शेटे यांनी फेसबुकवरील या चळवळीची माहिती घेतली आणि सकारात्मक प्रतिसाद दिसताच, महेशच्या सहकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून मंत्रालयात या कक्षाकडे सादर केली. लगेचच मंत्रालयाकडून बोलावणे आले आणि दोन कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. आज एक लाख रुपयांचा धनादेश घेऊन ते परतले.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या या माणुसकीच्या ओलाव्याने डोक्यावरचं ओझं हलकं झाल्याचा आनंद महेश निंबाळकरच्या सुरातून व्यक्त होत होता, पण दररोजच्या उपचाराच्या खर्चाची चिंता कायमच आहे, या काळजीची किनार मात्र या सुरातून लपत नव्हती!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2017 1:56 am

Web Title: mantralaya help to injured young man
Next Stories
1 मीरा-भाईंदरमध्ये भाजप-सेनेत लढत?
2 गुणवत्तावाढीसाठी पदोन्नती धोरणात बदल
3 नऊ थरांची दहीहंडी गोविंदा पथकांच्या आग्रहामुळे
Just Now!
X