मराठी टायपिंगमध्ये दहापट वाढ
मराठी शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटत असली तरी मराठी भाषाभिमान मात्र फोफावत असल्याचे मोबाइल वापरकर्त्यांच्या मराठीतून टंकण्याच्या वाढत्या सवयींमधून लक्षात येत आहे. इंग्रजी किंवा मिंग्लिश भाषेत मोबाइलवर संदेशवहन करणारी तरुणाई आता जोमाने मराठीत टाइप करू लागली आहे. एका पाहणीनुसार मोबाइलवर मराठी टायपिंगचे प्रमाण एक-दोन नव्हे, तर चक्क दहा पटींनी वाढल्याचे लक्षात आले आहे.
मराठी अ‍ॅप्समध्ये आलेली सुलभता मोबाइलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर मराठीतून व्यक्त होण्यास प्रवृत्त करत असल्याचे निरीक्षण संगणकतज्ज्ञ माधव शिरवळकर यांनी नोंदविले. ठरावीक साच्यातील कळफलक उपलब्ध असल्यामुळे अनेक जण मराठी टाइप करण्यास धजावत नव्हते. मात्र आता कळफलकाचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे मोबाइलवर मराठीला सुगीचे दिवस आल्याचेही ते म्हणाले.

प्रादेशिक भाषा आणि वापरकर्ते
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक भाषांचा वापर करणे या व्यावसायिक हेतूमुळे देशातील अनेक जण इंटरनेटशी जोडले गेले आहेत. ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’ने जून २०१५ मध्ये सादर केलेल्या अहवालातील काही नोंदी.
* शातील शहरांमध्ये १८ कोटी ८० लाख इंटरनेट वापरकर्ते आहेत. यापैकी ८ कोटी १० लाख प्रादेशिक भाषांचा वापर करतात.
* ग्रामीण भागात ८ कोटी १० लाख इंटरनेट वापरकर्ते आहेत. यापैकी चार कोटी ६० लाख प्रादेशिक भाषांचा वापर करतात.
* शहरांमध्ये ७१ टक्के वापरकर्ते संवादासाठी इंटरनेटचा वापर करतात, तर हेच प्रमाण ग्रामीण भागात ३६ टक्के इतके आहे.
* शहरांत ६६ टक्के लोक समाजमाध्यमांसाठी इंटरनेट वापरतात, हेच प्रमाण ग्रामीण भागांत ३२ टक्के आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयआयटी मुंबईतील ‘इंडस्ट्रिअल डिझायनिंग सेंटर’ (आयडीसी)ने विकसित केलेल्या ‘स्वरचक्र’ या मराठी कळफलक अ‍ॅपने नुकत्याच नोंदविलेल्या पाहणीनुसार २०१३मध्ये ज्या वेळेस त्यांचे अ‍ॅप बाजारात दाखल झाले त्या वेळेस हे अ‍ॅपधारक प्रत्येक व्यक्ती दरमहा १९ मराठी शब्द टाइप करत होते. हीच संख्या २०१५ मध्ये दरडोई दरमहा ११९ शब्दांपर्यंत पोहोचल्याची माहिती निरीक्षण आयडीसीमधील प्राध्यापक अनिरुद्ध जोशी यांनी दिली.अ‍ॅपमध्ये हिंदी आणि मराठीसह बारा प्रादेशिक भाषा उपलब्ध आहे.