मुंबई : उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाल्याने रस्त्यावर उतरलेल्या रंगकर्मीची सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली असून आज, मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे.

हिंदमाता येथे सोमवारी शेकडो रंगकर्मीनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. तसेच राज्यभरातील रंगकर्मीनी आपआपल्या जिल्ह्य़ाच्या ठिकाणी आंदोलन केले. त्यानंतर सांस्कृतिक मंत्र्यांनी रंगकर्मीना भेटण्याचे आश्वासन दिले. ही बैठक मंगळवारी दुपारी १२ वाजता होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांत मनोरंजन क्षेत्राला लागलेली घरघर अद्याप संपलेली नाही. हजारो कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांकडे नोकऱ्या नाहीत तर काही कर्जाच्या ओझ्याने त्रस्त आहेत. असे असूनही आजवर राज्य सरकारने रंगकर्मीची दखल घेतलेली नाही. अनेकदा  मदतीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आरोप आंदोलक रंगकर्मीनी केले.

मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्य़ांमध्ये आंदोलन करण्यात आले. मुंबईतील हिंदमाता परिसरातील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याशेजारी एक हजारांहून अधिक रंगकर्मी आंदोलनासाठी एकत्र आले होते. यामध्ये नाटय़कर्मी, वादक, नर्तक, लोककलावंत, लावणी कलाकार उपस्थित होते. यावेळी ‘जागर रंगकर्मीचा’ हा कार्यक्रम सादर करून कलाकारांनी आपल्या मागण्या मांडल्या. दुपारी १२च्या सुमारास हिंदमाता परिसर आंदोलनकर्त्यांनी गजबजून गेला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या विजय पाटकर, विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, शीतल माने या रंगकर्मीना भोईवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शेकडो आंदोलनकर्ते पोलीस ठाण्याच्या दिशेने गेले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिकमंत्री यांच्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत भोईवाडा पोलीस ठाण्याबाहेरच ‘ठिय्या आंदोलन’ करण्याचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला होता.