06 August 2020

News Flash

शहरबात : वेळबदलाचा उताराही तात्पुरताच!

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या व्यापारी केंद्राच्या परिसरातही ‘मेट्रो-२’चे काम सुरू होणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

नीरज पंडित @nirajcpandit

सध्या शहरात विविध ठिकाणी ‘मेट्रो’ची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यामुळे नागरिकांना शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांना सामना करावा लागत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि सर्वाधिक गर्दीच्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या व्यापारी केंद्राच्या परिसरातही ‘मेट्रो-२’चे काम सुरू होणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येथील कार्यालयीन वेळांत बदल करण्याचा प्रस्ताव आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रत्येकाची किमान दोन वेळच्या खाण्याची सोय तरी नक्कीच होते. यामुळे या शहरात परराज्यातून मोठा लोंढा येतो. त्यांना सामावून घेत असतानाच शहरातील जागा आणि पायाभूत सोयीसुविधा अपुऱ्या पडू लागल्या. यामुळे उन्नत मुंबई उभी राहू लागली. शहरात ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. त्याचबरोबर नवी मुंबईला जोडणारा उन्नत रेल्वे मार्गही सुरू झाला. हे उपाय वाढत्या गर्दीला आवरण्यात आणि सावरण्यातही अपुरे पडू लागले आहेत. यामुळे शहरात सुमारे २५० किलोमीटरचे मेट्रो जाळे पसरविण्याची योजना आखण्यात आली. यात दक्षिण मुंबई ते पश्चिम मुंबई ते मध्य मुंबई अशा विविध शहरांच्या जोडणीचा विचार करण्यात आला. गेली दहा वर्षे विविध स्तरावर काम सुरू असलेल्या या प्रकल्पांना मूर्त स्वरूप देण्यात येत आहे. शहरातील रस्ते मेट्रोच्या कामांनी व्यापून गेले आहेत.

सध्या शहरात मेट्रो-३, मेट्रो-७, मेट्रो-२अ, मेट्रो-२ब या मार्गाचे काम सुरू आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. रेल्वेने प्रवास करावा तर तेथेही गर्दी. बेजार झालेले मुंबईकर कार्यालयात रोज उशिरा पोहोचू लागले आहेत. ‘बीकेसी’तही मेट्रोच्या कामांना सुरुवात होणार आहे. या परिसरात कामासाठी येणाऱ्या सुमारे चार लाख मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने या भागातील कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव सरकार तसेच खासगी कंपन्यांसमोर ठेवला आहे. एमएमआरडीएच्या या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून अल्पावधीतच येथील कार्यालयांच्या वेळा बदलणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील गर्दी कमी व्हावी या उद्देशाने रेल्वे मंडळानेही कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव सरकारदरबारी ठेवला होता. पण त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मग मेट्रोसाठी वेळ बदल करणाऱ्या सरकारला रेल्वेचा प्रस्ताव का नको वाटतो याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. रेल्वेचा प्रस्ताव स्वीकारल्यास सकाळी ठरावीक वेळी होणारी गर्दी कमी होऊन उपनगरातून नोकरीनिमित्त शहराकडे येणाऱ्या लोकांना लोकलमध्ये तुलनेत कमी गर्दीत प्रवास करता येऊ शकेल. यामुळे एक प्रवासी म्हणून त्याच्या लोकलमध्ये चढून किमान नीटपणे उभे राहता येण्याची अपेक्षा पूर्ण होऊ शकेल. मात्र सरकारी पातळीवर याबाबतचे घोडे अडलेले आहे.

याच वेळी वारंवार होणारी वाहतूक कोंडी, रेल्वेचा खोळंबा यामुळे कामावर उशिरा पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोज ‘लेटमार्क’ लावण्यापेक्षा त्यांच्या कामांच्या वेळात बदल करण्याचा पर्याय अनेक कंपन्यांनी स्वीकारला. यामुळे अंधेरीतील सीप्झमध्ये, मालाड येथील मांइडस्पेस या व्यापार संकुलात याचबरोबर विक्रोळी येथील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ सकाळी ७ ते ११ या चार तासांमध्ये विभागली आहे. याचबरोबर अनेक कंपन्यांनी तर कर्मचाऱ्याने कोणत्याही वेळी येऊन नऊ तास काम करावे आणि जावे अशी मुभाही दिली आहे. यामुळे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रवासाचा ताण काहीसा कमी जाणवू लागला आहे. परिणामी त्यांच्या कामाचा दर्जाही पूर्वीपेक्षा सुधारला आहे. जर कर्मचारी सुखकर प्रवास करून कार्यालयात पोहोचला तर तो अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. पण मुंबईत सकाळच्या वेळी असा प्रवास होणे फारच जिकिरीचे आहे. यामुळेच आमच्या कंपनीने ‘मुक्तवेळे’चा पर्याय स्वीकारला. प्रत्येकाने त्याच्या वरिष्ठांशी बोलून वेळ निश्चित करून घ्यावी आणि वरिष्ठाने त्याचे काम कोठेही बाधित होणार नाही याचा विचार करून वेळबदल मान्य करावा असा नियम असल्याचे विक्रोळीतील एका बडय़ा आयटी कंपनीत मनुष्यबळ विकास विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रोचे काम सुरू होईल तेव्हा दोन्ही दिशांच्या मार्गिकांमधील प्रत्येकी एक मार्गिका पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत. याचा त्रास या संकुलात कामानिमित्त येणाऱ्या सुमारे ४० हजारांहून अधिक वाहनांना बसणार आहे. या परिसरात सर्वाधिक वर्दळ सकाळी ९ ते १०.३० या दरम्यान असते. तर संध्याकाळी ५.३० ते ७ या वेळात विरुद्ध दिशेने जास्त वर्दळ दिसते. त्यामुळे वेळबदल पर्याय एमएमआरडीएने पुढे आणला आहे. अर्थात वेळबदलाचा उपाय मुंबईकरांच्या जखमेवरची तात्पुरती फुंकर आहे. वेळबदलाचा पर्याय किंवा ‘मुक्तवेळे’चा पर्याय केव्हाही योग्य आहे. परंतु शहरातील वाढती गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि योग्य त्या पायाभूत सुविधा देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. वेळबदलाचा पर्याय उपयुक्त असलेल्या कंपन्यांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे त्यालाही मर्यादा आहेत. सरकारी यंत्रणांना हा वेळबदल शक्य आहे. वेळबदलाबरोबरच सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवल्यास नागरिकांनाही सोयीचे ठरेल. मात्र सरकारी नोकरदारांच्या वेळांना हात लावणार कोण? ही इच्छाशक्ती नसल्यानेच सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलांचा प्रस्ताव गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. अर्थात तोही पुन्हा तात्पुरता पर्याय आहे. सरकारने पायाभूत सुविधांवर करोडो रुपये खर्च केले म्हणजे काहीतरी नवीन केले असा त्यांचा समज झाला आहे. त्याचे परिणाम बऱ्याच वर्षांनी दिसणार आहेत. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी किती वर्षे वर्तमानात त्रास सहन करणार हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे. म्हणूनच सरकारने सध्याच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे आवश्यक आहे.

शहरातील कार्यालयातील वेळा बदलल्यास सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस वाहतूक यंत्रणांवर येणारा ताण काही प्रमाणात कमी होईलही पण हा पर्याय तात्पुरता आहे, असे मत ‘यूडीआरआय’चे पंकज जोशी यांनी नोंदविले. सरकारने सध्याची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट कशी करता येईल याचा विचार करून मग नवीन पायाभूत सुविधा उभाराव्यात, जेणेकरून लोकांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल, असेही जोशी म्हणाले. विकास हा नेहमीच लोकसहभागातून शक्य होतो, असे सांगितले जाते. हे खरे असले तरी उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानातील जगण्यात किती बदल करायचे यालाही मर्यादा असतात. या सगळ्याचा सारासारविचार करून शहरातील प्रत्येक गल्लीत जाणारी ‘बेस्ट’ अधिक बळकट करून, प्रभावी केल्यास वर्तमानात होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी होईल आणि विकासात लोकसहभागही वाढेल. मग अशा तात्पुरत्या पर्यायांचा विचार करण्याची गरजही पडणार नाही.

नीरज पंडित Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 1:38 am

Web Title: mmrda proposal for offices in bkc to change work timings during metro 2b construction
Next Stories
1 मलबार हिलवरून दक्षिण मुंबईचे दर्शन
2 पोलीस गणवेशातील राजकीय कार्यकर्त्यांच्या मिरासदारीवर अंकुश
3 संगीत नाटकांना जुने वैभव प्राप्त करून देणार-विनोद तावडे
Just Now!
X