सध्या देशामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर करोना बाधितांचा एकूण आकडा ५० हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईमधील करोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यामुळे आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे. काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. असं असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनाही यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाराजी व्यक्त केली. देशपांडे यांच्या ओळखीतील एका व्यक्तीला बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे सांगताना त्यांना अनावर झाल्याचे पहायला मिळालं. मनसेच्या अधिकृत पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
“भारताची आरोग्य व्यवस्था किती पोकळ आहे, हे एव्हाना सर्वांना कळालं असेलच. तरीही प्राप्त परिस्थितीत आजाराशी लढताना पण जेंव्हा आपलीच माणसं, जी प्रशासनात असतात तेच मनाचे कप्पे बंद करून बसतात आणि तेंव्हा जनतेची हतबलता पाहून अश्रू अनावर होतात,” अशा कॅप्शनसहीत मनसेच्या फेसबुक पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये
या व्हिडिओमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे हे करोनाग्रस्तांबरोबरच सामान्य रुग्णांचे हाल होत असल्याचे सांगताना दिसत आहेत. “सरकारी रुग्णालयांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीय. रुग्णांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. माझ्या ओळखीतील एका काकांनी सकाळी १९१६ ला फोन केला. मात्र रात्रीपर्यंत त्यांना बेड उपलब्ध झाला नाही. आणि आज सकाळी सहा वाजता त्या काकांचा मृत्यू झाला,” हे सांगताना देशपांडे यांच्या भावनांचा बांध फुटला आणि ते ऑन कॅमेरा रडू लागले. डोळे पुसत स्वत:ला सावरत त्यांनी लोकं आपल्याला संपर्क करत असल्याची माहिती दिली. “रुग्णालयाचे अधिकारी फोन उचलत नाहीत. ८०० बेड आहेत हजार बेड आहेत असं खोटं सांगितलं जातयं. इथे आयसीयूमध्ये साधा एक बेड मिळत नाहीय,” असा आरोप देशपांडे यांनी केलं आहे.
“कोविड झालेल्यांची अवस्था वाईट आहेच. मात्र त्याचबरोबरच ज्यांना कोविड झाला नाहीय, ज्यांची फक्त शुगर वाढली आहे किंवा इतर त्रास आहे त्यांनाही बेड मिळत नाहीय. प्रशासनाला मी हात जोडून विनंती करेन की त्यांनी काहीतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. कारण नुसतं गोड बोलून काहीही होणार नाहीय,” असंही देशपांडे या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत.
एकीकडे मुंबईमध्ये करोनाबाधितांसाठी विशेष रुग्णालये उभरली जात असतानाच दुसरीकडे रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून रोज दीड हजार रुग्णांची नोंद होत असतानाच मंगळवारी मुंबईमध्ये नव्याने करोनाबाधित रुग्ण अढळण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आलं. मंगळवारी मुंबईत १०१५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.