संदीप आचार्य 
मुंबई: मुंबईत करोना च्या चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून वेळीच तपासणी व उपचार करण्यावर महापालिका भर देत असल्याने रुग्णालयात प्रत्यक्ष दाखल होणार्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. या उलट परिस्थिती ठाण्याची असून प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल होणार्या म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मुंबईपेक्षा ठाण्यात जास्त झाली आहे. मुंबईत आजघडीला २४,९१२ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाण्यात हिच संख्या २५३३१ एवढी झाली आहे.

ठाणे जिल्हातील सहा महापालिकांमध्ये तसेच ठाणे ग्रामीण भागात करोना रुग्णांच्या उपचारासाठी पुरेसे बेड नाहीत तसेच ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची बोंब आहे. मुख्य म्हणजे या सहाही महापालिकांमध्ये उपचारात समन्वय नसून नवीन रुग्ण शोधण्यासाठी पुरेशी चाचणी केंद्र नाहीत की करोना रुग्णाच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची ठोस यंत्रणाही उभारण्यात आलेली नाही. किमान याबाबतची माहिती संबंधित महापालिका व जिल्हाधिकारी स्तरावरून दिलेली नाही. ठाणे जिल्ह्यात करोनाच्या रुग्णांची व मृत्यूंची संख्या वेगाने वाढत असताना नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत व केल्या जातील तसेच रुग्ण संपर्क शोध मोहीम कशी राबवली जाणार याची माहिती ना पालक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ना जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याकडून काही ठोस सांगितले जात आहे. मुंबईत करोनाचे एकूण ८२,०७४ रुग्ण आहेत तर ठाण्यात करोनाची संख्या आता वेगाने वाढत असून आजघडीला ४३,६३४ रुग्णसंख्या झाली आहे. ठाण्यातील करोना मृत्यू संख्या आता हजारपार झाली असून १०७५ रुग्णांचे मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे.

या पार्श्वभूमीवर उपाचाराखील रुग्णांची संख्या आता मुंबईपेक्षा जास्त झाली असून त्या तुलनेत उपचाराच्या सुविधा मात्र पुरेशा नाहीत ही गंभीरबाब असल्याचे ठाण्यातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. ठाण्यात आज २५३३१ रुग्ण उपचाराखाली म्हणजे अ‍ॅक्टिव्ह असून मुंबईपेक्षा ४१९ एवढी ही रुग्णसंख्या जास्त आहे. ठाणे महापालिकेने गाजावाजा करत बाळकुम येथे करोना सेंटरचे उद्घाटन केले मात्र हजार बेड असलेल्या या केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांअभावी अवघे दोनशे बेड कार्यरत असल्याचे पालिकेच्या एका अधिकार्याने सांगितले. महापालिकेतील अधिकार्यांना ठाण्यातील बेडची संख्या, ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर तसेच अन्य आवश्यक माहिती विचारली असता ते थोड्यावेळाने माहिती घेऊन सांगतो हे ठराविक उत्तर ऐकायला मिळते.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल तसेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी वा अन्य अतिरिक्त आयुक्तांकडून वेळोवेळी आवश्यक माहिती तात्काळ दिली जाते. आयुक्त चहेल यांनी पहिल्या दिवसापासूनच महापालिका कोणतीही माहिती दडवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानुसार ८६२ शिल्लक मृत्यूंची पहिल्या टप्प्यातील माहिती तात्काळ जाहीर केली तर आता उर्वरित शिल्लक मृत्यूंची माहिती जमा करण्याचे काम सुरु आहे. पालिकेतील बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, क्वारंटाईन सेंटर, रुग्णसंख्या तसेच जुलै अखेरपर्यंत किती बेड वाढवले जाणार याचा सारा तपशील आयुक्त चहेल यांच्या तोंडावर असतो. मात्र ठाण्यात हिच माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यापासून संबंधितांना लेखी प्रश्न पाठवून विचारल्यावरही मिळू शकलेली नाही. मुंबईत आज उपचाराखालील अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ८९०० असून मुंबईतील ४००० बेड रिकामे असल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले. मुंबईत ५२,३९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज मुंबईत करोनाचे ८२ हजार रुग्ण असून दोन लाख रुग्णसंख्या जरी झाली तरी त्याला पुरेल अशी आरोग्ययंत्रणा जुलैअखेरीस मुंबई महापालिकेकडे तैनात असेल असे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

“आम्ही मुंबईत एक लाख चाचण्या करण्याबरोबरच रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. विभागवार तसेच कंटेनमेंट झोन म्हणजे साथीची लागण असलेल्या भागांवर आमचे विशेष लक्ष आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेणे, शंभर टक्के आयसीयू बेड ताब्यात घेणे तसेच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार होऊ नये यासाठी आमची पथके कार्यरत आहेत. नानावटी रुग्णालयाने जादा बिल आकारल्याचे लक्षात येताच महापालिकेने तात्काळ गुन्हा दाखल केल्याचे आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी सांगितले. तसेच खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिल आकारले जात असल्यास संबंधित विभाग अधिकारी व उपायुक्तांकडे तक्रारी दाखल करा”, असेही आयुक्त चहेल म्हणाले.

 

ठाणे जिल्ह्यात माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप आमदार संजय केळकर तसेच मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे गेले महिनाभार खाजगी रुग्णालयांकडून करोना रुग्णांची होत असलेल्या लुटमारीवर बोलत असताना ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रात याबाबत नेमकी काय कारवाई केली याची कोणतीही माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जाहीर केली आहे.