मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून गुरुवारी करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ३५ हजाराचा आकडा ओलांडला. दिवसभरात तब्बल एक हजार ४३८ जणांना करोनाची बाधा झाली, तर ३८ जणांचा मृत्यू झाला.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र करोनाची बाधा होणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. गुरुवारी एक हजार ४३८ जणांना बाधा झाल्याचे करोनाविषयक चाचणीच्या अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या ३५ हजार २७३ वर पोहोचली. गुरुवारी ३८ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १९ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. यापैकी २४ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गुरुवारी ८३९ करोना संशयितांना दाखल करण्यात आले असून आतापर्यंत २८ हजार ५५४ करोना संशयितांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे गुरुवारी सुमारे ७६३ करोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत तब्बल नऊ हजार ८१७ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई महापालिकेने २७ मेपर्यंत तब्बल एक लाख ८५ हजार ७०१ जणांची करोनाविषयक चाचणी केली आहे.

गुरुवारी तीन हजार ९४८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या एन, पी-उत्तर, आर-मध्य आणि एस विभागांच्या हद्दीत करोना रुग्ण वाढीचा दर ८ टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. तर मुंबईमध्ये २२ मे ते २७ मे या काळात करोना वाढीचा दर ५ टक्के होता.

आणखी एका पोलिसाचा बळी, मृतांची संख्या १४

मुंबईतील आणखी एका पोलिसाचा करोना संसर्गाने बळी घेतला. मालवणी पोलीस ठाण्याचे हवालदार जगदीश पोटे यांचा गुरुवारी करोनाने मृत्यू झाला. पोटे यांनी सुरुवातीला खासगी डॉक्टरकरवी  उपचार घेतले.  नंतर जेजे रुग्णालयात चाचणी के ली असता ते करोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना रुग्णालयात दाखल के ले गेले. मात्र उपचारांदरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबई पोलीस दलात करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद १४ झाली.

धारावीत १६७५ रुग्ण

धारावीमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या संथगतीने वाढत असतानाच घरची ओढ लागलेल्या परप्रांतिय कामगारांनी रस्त्यावर गर्दी केली होती. त्यामुळे धारावीत करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. धारावीमध्ये गुरुवारी ३६ जणांना करोनाची बाधा झाली असून बाधितांची एकूण संख्या १६७५ वर पोहोचली आहे. गुरुवारी ३६ जणांना करोनाची बाधा झाली. माहीम परिसरात २४६ जणांना करोनाची बाधा झाली असून या करोनाबाधितांमध्ये पोलीस वसाहतीतील ५९, तर विविध रुग्णालयांमधील आरोग्य सेवेत कार्यरत २७ जणांचा समावेश आहे. तर दादर भागातील २७१ जणांना करोनाची बाधा झाली असून त्यात सुश्रुषा रुग्णालयातील ११ जण, तर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

धारावी, माहीम, दादरमध्ये सर्वाधिक

मुंबईमधील धारावी, दादर, माहीम, भायखळ्याबरोबर परळ, माटुंगा, कुर्ला, वांद्रे पूर्व, अंधेरी-पश्चिम, वरळी, अंधेरी पूर्व, चेंबूर पूर्व, घाटकोपर परिसर करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अतिधोकादायक बनल्याचे पालिकेने जारी केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. या यादीत जी-उत्तर म्हणजेच धारावी, दादर, माहीम परिसरात सर्वाधिक २७२८ जणांना करोनाची लागण झाली.  जी-उत्तर विभागात काम करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली असून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भायखळा, नागपाडा विभागाचा समावेश असलेला ‘ई’ विभाग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या परिसरात २,४३८ जणांना बाधा झाली असून त्यापैकी ८०३ जण बरे झाले आहेत. पालिकेने जारी केलेल्या २७ मेच्या रुग्णसंख्येच्या यादीमध्ये धारावी, दादर, माहीम, भायखळ्याबरोबर परळ, माटुंगा, कुर्ला, वांद्रे पूर्व, अंधेरी-पश्चिम, वरळी, अंधेरी पूर्व, चेंबूर पूर्व, घाटकोपर परिसर करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने अतिधोकादायक बनले आहेत.