जूनच्या मध्यात ठाणेकरांना सरकत्या जिन्यांची भेट देणाऱ्या मध्य रेल्वेने आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात अनुक्रमे डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवरील सरकते जिने सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. डोंबिवली येथे ७ ऑक्टोबर रोजी आणि कल्याण येथे १७ ऑक्टोबर रोजी या सरकत्या जिन्यांचे लोकार्पण होणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी वर्तवली.
मध्य रेल्वेने मुंबई विभागात सरकते जिने बसवताना ठाण्याला पसंती दिली. त्यानंतर लगेचच डोंबिवली येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर मुंबईच्या दिशेला आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर कल्याणच्या दिशेला सरकते जिने उभारले जातील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले होते. हे जिने १५ ऑक्टोबपर्यंत कार्यान्वित होतील, असेही त्या वेळी सांगण्यात आले होते.
मात्र सप्टेंबर महिन्यात आलेल्या जोरदार पावसामुळे हा मुहूर्त लांबणीवर जाणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण डोंबिवली स्थानकातील सरकते जिने सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने १५ ऑक्टोबरच्या प्रस्तावित तारखेच्या एक आठवडय़ाआधीचा मुहूर्त साधला आहे. विशेष म्हणजे तेवढय़ावरच न थांबता कल्याण येथील सरकते जिनेही त्यानंतरच्या १० दिवसांत सुरू करण्यात येतील, असेही राणे यांनी स्पष्ट केले आहे.