दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५८) यांनी दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी मोहन यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.  गुजराती भाषेतील चिठ्ठीत काही राजकीय पुढारी, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा उल्लेख असल्याचे समजते आहे. मात्र याबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

नरिमन पॉईंट येथील ‘सी ग्रीन साऊथ’ हॉटेलच्या पाचव्या माळ्यावरील खोलीत डेलकर हे दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. मोहन रविवारी रात्री हॉटेलमध्ये आले. सोमवारी आत्महत्येची बाब उघड झाली तेव्हा ते खोलीत एकटेच होते, अशी माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. मोहन यांनी  सोबत आणलेल्या शालीचा गळफास घेण्यासाठी वापर केला. त्यावरून त्यांनी ठरवून टोकाचे पाऊल उचलले, असा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे.

या प्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद  केली आहे.  मोहन यांचा मृतदेह  शवचिकित्सेसाठी रुग्णालयात पाठवल्याचे पोलीस प्रवक्ता चैतन्य एस. यांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीनुसार ही आत्महत्या असून  संशयास्पद  असे  काही आढळले नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय घडले ?

* मोहन यांच्या वाहन चालकाने सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. बराचवेळ मोहन यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चालकाने गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या डेलकर कुटुंबाला ही बाब कळवली.

* कुटुंबाचेही दूरध्वनी मोहन स्वीकारत नसल्याने अस्वस्थता वाढली.

* हॉटेल व्यवस्थापनाचे अन्य चावीने दार उडण्याचे प्रयत्न फसल्याने चालकाने शेजारील खोलीच्या गॅलरीतून मोहन यांच्या गॅलरीत उडी घेतली तेव्हा मोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.