डिझेल दरवाढीचा परिणाम; १० ते १५ टक्के वाढीच्या प्रस्तावावर विचार

मुंबई : डिझेल दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे एसटीच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम होत आहे. परिणामी एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या खिशातूनच वाढणारा खर्च काढला जाणार आहे. महामंडळाकडून १० ते १५ टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या प्रस्तावावर काम सुरू असून एसटीच्या बोर्डाच्या बैठकीत सादर केल्यानंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकरच राज्य परिवहन प्राधिकरणाकडेही पाठविण्यात येणार आहे. १० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाल्यास ३ ते ५० रुपयांपर्यंत अधिक प्रवासभाडे मोजावे लागतील आणि १० टक्क्यांपेक्षा जास्त भाडेवाढ झाली तर जास्तीत जास्त ५० रुपयांपेक्षा अधिक तिकिटदरांत फरक होणार आहे.

डिझेल दराचा भार वाढलेला असतानाच कामगारांच्या महागाई भत्त्यातही वाढ झाली आहे. २०१४ ला १०७ टक्के असलेला महागाई भत्ता २०१८ मध्ये १३६ टक्क्यांपर्यंत द्यावा लागत आहे. याबरोबरच २०१६-१७ चा प्रलंबित कामगार वेतन कराराचा बोजाही महामंडळावर पडणार आहे. या वाढीव खर्चामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत मात्र फारशी भर पडत नाही. २००७-०८ मध्ये १६८ कोटी रुपयांनी नफ्यात आलेले एसटी महामंडळ हळूहळू तोटय़ात चालले आहे. २०१७-१८ मध्ये वार्षिक ५४४ कोटी रुपये तोटा होत असून संचित तोटा दोन हजार ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे भाडेवाढीशिवाय पर्याय राहिलेला नाही.

त्यासाठी महामंडळाने १० ते १५ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावावर काम सुरू केले आहे. मागील भाडेवाढ ३१ जुलै आणि २२ ऑगस्ट २०१४ रोजी दोन टप्प्यांत झाली आणि ती एकूण १४ टक्के होती. एकंदरीतच सध्याची परिस्थिती पाहता भाडेवाढ करण्याचा गांभीर्याने विचार केला जात आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करून प्रथम एसटी महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत ठेवण्यात येणार आहे.

भाडेवाढ अशी

१० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाल्यास तीन रुपये ते ५० रुपयांपर्यंत प्रवासदर वाढू शकतो. त्यामुळे मुंबई ते पुणे साध्या बसचे असलेले भाडे १६० रुपयांवरून १७५ पर्यंत जाईल, तर शिवनेरीच्या भाडय़ातही कमीत कमी १५ आणि जास्तीत जास्त ५० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

जर भाडेवाढ १५ टक्क्यांपर्यंत झाली तर एसटीच्या भाडय़ात त्यापेक्षाही अधिक वाढ होईल.

परिस्थिती काय?

* एसटी महामंडळाकडून करण्यात येणारी भाडेवाढ डिझेलचा वाढत जाणारा दर, चाकांचे (टायर) दर, कामगारांचा महागाई भत्ता आणि बस सांगाडय़ाचा दर यावर ठरते.

*  गेल्या दहा महिन्यांत डिझेल आठ रुपयांनी महागले आहे. जुलै २०१७ मध्ये ५४.७४ रुपये असलेले डिझेलचे दर एप्रिल २०१८ मध्ये ६३.७८ रुपयांपर्यंत पोहोचले.

* एसटीला दररोज १२ लाख १२ हजार ५०० लिटर डिझेल लागते. जुलै २०१७ मध्ये डिझेलची किंमत ही कमी होती. त्या तुलनेत यंदा डिझेलच्या वाढीव दरामुळे दररोज ९७ लाखांचा तोटा एसटी महामंडळाला होत आहे.

महामंडळाचा खर्च

१) कामगारांच्या वेतनावर- ४४ टक्के

२) डिझेल खर्च- ३३ टक्के

३) प्रवासी कर- १२ टक्के

४) भांडवली खर्च- २ टक्के

५) घसारा- ९ टक्के