संदीप आचार्य
मुंबईत करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. कालपर्यंत करोना रुग्णांना बेड मिळण्यासाठी धावपळ करावी लागत होती तर आता महापालिका रुग्णांच्या दारात जाऊन त्यांना रुग्णालयात दाखल करत आहे. मुंबईतील करोनाला नियोजनबद्ध आटोक्यात आणताना पालिकेने खर्चाची कोणतीही चिंता केली नाही तर रुग्ण वाचला पाहिजे या भूमिकेतून आरोग्य व्यवस्था बळकट करत नेली. महापालिकेने गेल्या पाच महिन्यात करोनाच्या लढाईसाठी तब्बल ६१० कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत.

“ज्या पद्धतीने जगातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीतील करोना रोखला त्याचे कौतुक जगातील अनेक माध्यमांनी तर केलेच पण करोनाच्या या लढाईत रोजच्या चाचण्या, दाखल होणारे रुग्ण, बरे झालेल्या रुग्णापासून मृत्यू पावणार्यांच्या माहितीपर्यंत कोणतीच गोष्ट आम्ही लपवली नाही. बेड पासून सर्व प्रकारची आवश्यक माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध असून या करोनाकालिन पारदर्शकतेची दखल ‘वॉशिंग्टन पोस्ट’नेही घेतल्या”चे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

42 gangster tadipaar from pune city
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी शहरातील ४२ गुंड तडीपार
Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध
Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
thane district, administration, thane water supply department
लोकसत्ता इम्पॅक्ट : ठाणे जिल्हा प्रशासन जागे झाले, पाणी टंचाई आधीच टँकर सुरू करण्याच्या दिल्या सूचना

“मुंबईपुरते बोलायचे झाल्यास आज १,१९२४० करोना रुग्णांची संख्या असून ९१६७३ रुग्ण बरे झाले आहेत. आता साधारणपणे १० हजाराहून अधिक चाचण्या होत असून हजार ते बाराशे करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. मात्र त्यातील रुग्णालयात दाखल करण्यासारखे दोनशे ते अडीचशे रुग्णच असतात. सध्या आमच्याकडे अॅक्टिव्ह म्हणजे रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या २०,६७९ एवढीच असल्या”चे आयुक्त चहल म्हणाले. “कालपर्यंत करोनाचे रुग्ण रुग्णालयात बेड मिळावे यासाठी वणवण भटकत होते. आम्ही गेल्या दोन महिन्यात केलेल्या पद्धतशीर नियेजनाने चित्रच बदलले आहे. आज चाचणीत रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच आवश्यकतेनुसार आमचेच डॉक्टर रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखलही करतात. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात आम्ही नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. रुग्णाचा चाचणी अहवाल २४ तासात देणे बंधनकारक केले असून सकाळी अहवाल मिळताच वॉर्डातील डॉक्टर रुग्णाशी बोलून रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करतात. एकवेळ खाजगी रुग्णालयात महागडी औषधे मिळणार नाही पण पालिकेच्या रुग्णालयात औषधे नाही, असे होऊच शकत नाही”, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

मुंबईची सव्वा कोटीहून अधिक असणारी लोकसंख्या, वारेमाप वाढलेल्या झोपडपट्टी यामुळे मुंबई करोनाचा सामना कसा करणार हा प्रश्नच होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सच्या नियुक्तीपासून ते करोना रोखण्यासाठीच्या पालिकेच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेवले. मुख्यमंत्री मदत निधी असो की पालिकेचा निधी असो करोना विरुद्धच्या लढाईत पैसा कमी पडणार नाही, याची काळजी उद्धव ठाकरे यांनी घेतली. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजे हा त्यांचा आग्रह असल्याचे आयुक्त चहल म्हणाले.
मुंबई महापालिकेने करोनाच्या लढाईत आतापर्यंत ६१० कोटी रुपये खर्च केले आहेत. यात रुग्ण व डॉक्टरांच्या जेवणासाठी ७३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले. केंद्रीय खरेदी विभागाच्या माध्यमातून १२४ कोटी ४४ लाख रुपयांची उपकरण खरेदी करण्यात आली. मेकॅनिकल व इलेक्ट्रिक कामासाठी सहा कोटी ६० लाख, विशेष आरोग्य अधिकारी ६३ कोटी ८४ लाख, पालिका वॉर्डातील नियंत्रण कक्ष, सेव्हन हिल्स हॉस्पिटल व बीकेसी, गोरेगाव, दहिसर, मुलुंड, वरळी व महालक्ष्मी आदी ठिकाणच्या जम्बो सेंटरसाठी मिळून २५९ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसाठी ४० कोटी ९५ लाख, स्पेशालिटी रुग्णालयांसाठी १० कोटी ३० लाख तर उपनगरीय रुग्णालयांसाठी २९ कोटी ३३ लाख रुपये खर्च करण्यात आले. याशिवाय पालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एक कोटी रुपये खर्च असा सुमारे ६१० कोटी रुपये आजपर्यंत पालिकेने खर्च केले आहेत. अर्थात खर्च करताना अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी खरेदी करताना घेण्यात आली. निविदा वा दरकरार करताना पूर्ण पारदर्शकता होती म्हणूनच नायट्रेल मोजे ८.१० रुपये, लेटेक्स मोजे ४.५० रुपये, थ्री प्ले मास्क ६.५० रुपये, २०० एमएल सॅनिटाइजर ५० रुपये ४० पैसे, एन-९५ मास्क ४१ रुपये ७७ पैसे, पीपीइ किट व एन ९५ मास्क ३७८ रुपये व पीपीइ किट आणि थ्री प्ले मास्क २९९ रुपये २५ पैसे दराने आम्ही खरेदी केल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

“रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देताना खर्चाचाही आम्ही बारकाईने विचार केला. यातूनच जम्बो बेड सेवा, एका प्रयोगशाळेच्या चार प्रयोगशाळा, चाचण्यांची क्षमता वाढवणे, प्लाझ्मा थेरपी, अॅन्टिबॉडीचाचण्या, व्हेंटिलेटर, पल्सअॉक्सिमीटरपासून अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढवणे अशा अनेक गोष्टी केल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. आज पीपीइ किट असो की एन ९५ मास्क असो आता पालिका रुग्णालयात या गोष्टी मिळत नाही, असे कोणी सांगणार नाही. आज प्रत्येक वॉर्डतील नियंत्रण कक्षमधून थेट रुग्णांशी संवाद साधला जातो. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रत्येक वॉर्डात १० रुग्णवाहिका तैनात आहेत. रुग्णांची बारीकसारीक माहिती घेण्यासाठी पुरेसे डॉक्टर आहेत. मुख्य म्हणजे आम्ही केलेले सर्वेक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे. यातूनच मुंबईतील धारावीसह सर्व प्रमुख झोपडपट्टीमधील करोनाला आटोक्यात ठेवता आल्या”चे अतिरिक्त आयुक्त काकाणी म्हणाले.

एकीकडे चाचण्यांची संख्या वाढवून रुग्ण शोधायचे तर दुसरीकडे रुग्णांच्या संपर्कातील लोक शोधून त्यांचे विलगीकरण करायचे हे आव्हान आम्ही झोपडपट्टी व गरीब विभागात यशस्वीपणे पेलले. मुंबईत ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गंभीर रुग्ण येतात हे लक्षात घेऊन मुलुंड येथील १००० बेडच्या जंबो व्यवस्थेत ५०० बेड ठाणे पालिका परिसरासाठी राखीव ठेवले तर दहिसर येथे ५०० बेड मिरा- भाईंदर व वसईपट्ट्यासाठी राखीव ठेवले. “आज मुंबई महापालिकेकडे २१,८३५ बेड आहेत. आयसीयूचे १७७६ बेड, ऑक्सिजन व्यवस्था असलेले ११,२९७ बेड व व्हेंटिलेटर असलेले १०८९ बेड आहेत. महत्वाचे म्हणजे मुंबईतील करोना आटोक्यात आल्याने यातील अनेक बेड आज रिकामे असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले. करोना आटोक्यात आला असला तरी आम्ही सावध आहोत. पुन्हा लाट येऊ शकते तसेच साथीचे आजार लक्षात घेऊन आम्ही तयारीत आहोत”, असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले.