आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५टक्के जागांवरील ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या करिता मुंबईतील ३१३ खासगी शाळांमध्ये मिळून साडेआठ हजार जागा उपलब्ध आहेत.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार विनाअनुदानित अल्पसंख्याक शाळा वगळता सर्व खासगी खाळांमध्ये आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता २५ टक्के जागा राखीव असणार आहेत. या प्रवेशांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी हे प्रवेश ऑनलाइन करण्यात येणार आहेत. नर्सरी किंवा इयत्ता पहिली हा प्रवेशाचा टप्पा असणार आहे. या प्रवेशांकरिता मुंबईभरात २४ मार्गदर्शन केंद्रे असणार आहे. या केंद्रांबरोबरच पालकांना घरूनही आपल्या संगणकावरून ऑनलाइन अर्ज भरता येऊ शकतील. ही प्रक्रिया १५ एप्रिलपर्यंत चालेल. जागा वाटपांची यादी दोन टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यापीठात अनुसूचित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी ३ कोटींची योजना
मुंबई : मुंबई विद्यापीठात अन्य राज्यांतून तसेच जिल्ह्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी या उद्देशाने विद्यापीठाने अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन वसतिगृहे बांधण्याची योजना आखली आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडून विद्यापीठाला सुमारे तीन कोटींचे अनुदान मिळाले आहे.
या दोन्ही वसतिगृहामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वैद्यकीय सुविधा, सायबर कॅफे, कॅन्टीन, खेळण्यासाठीची जागा तसेच कॉमन रुम्स आदींचा त्यात समावेश असेल. मुंबई विद्यापीठातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची संख्या ५६४६ असून संलग्नित महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची संख्या ३९२७२ आहे.