मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावरील मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयात खटला प्रलंबित असतानाही अभिनेता सलमान खान याने स्वत:च्या संकेतस्थळावर खटल्याची माहिती प्रसिद्ध केली होती. यामुळे त्याच्याविरुद्ध महानगर दंडाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली अवमान कारवाईची तक्रार उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द करीत सलमानला दिलासा दिला. हेमंत पाटील यांनी वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे सलमानविरुद्ध खासगी तक्रार करीत त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी झाली. तेव्हा खटल्याबाबत चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जाऊ नये, या हेतूनेच खटल्याच्या सुनावणीबाबतच्या घडामोडी त्यावर जाहीर केल्याचा दावा सलमानच्या वतीने करण्यात आला. तसेच ही याचिका अर्थहीन असल्याचा दावा करीत याचिकाकर्त्यांला दंड करण्याची मागणी सलमानच्या वतीने अ‍ॅड्. रवी कदम यांनी केली. त्यावर आपण ही याचिका जनहितार्थ केल्याचा दावा याचिकाकर्त्यांने केला. परंतु न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावत दोन हजार रुपयांचा दंड सुनावला.

केईएम कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलिसास अटक
मुंबई : केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्याला बेकायदा डांबून मारहाण केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी पोलीस शिपाई सचिन घाडगे याला अटक केली.
केईएम रुग्णालयातील एका चोरी प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने याप्रकरणी शशिकांत सुर्वे या कर्मचाऱ्यावर संशय व्यक्त केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पोलीस शिपाई सचिन घाडगे याने चौकशीसाठी सुर्वेला बोलावले होते. यावेळी घाडगेने बेकायदेशीररित्या डांबून मारहाण केल्याचा आरोप सुर्वे याने केला होता. यामुळे केईएमच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत दोन तास काम बंद केले होते.
घाडगे याने सोमवारी भोईवाडा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. भोईवाडा न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या
अभ्यासाचा ताण असल्याचा संशय
मुंबई : विक्रोळीच्या गोदरेज टेकडी येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. ऋषभ पांडे (१७) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  ऋषभ हा विक्रोळीच्या गोदरेज वसाहतीत रहात होता. तो अकरावीत शिकत होता. त्याचबरोबर तो तंत्रशिक्षणाचाही अभ्यासक्रम करत होता. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास गोदरेज टेकडीच्या कैलाश कॉम्प्लेक्स येथील एका झाडाला त्याचा मृतदेह आढळळा. त्याने शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली होती, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सकपाळ यांनी सांगितले.
अभ्यास हेच कारण?
अभ्यासावरुन त्याची आई त्याला बोलत होती. तो ताण सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिलेली नव्हती.

१२ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या
मुंबई : राज्यातल्या १२ पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या.  बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे. कंसात त्यांच्या नव्या नेमणुकीचे ठिकाण.
एस.टी.राठोड (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ),  ए.एम.बारगळ (पोलीस उपायुक्त, नाशिक शहर), टी.सी.दोशी ( पोलीस उपायुक्त, पुणे शहर)पी.एन.कराड (अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अमरावती), व्ही.यू.जाधव (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर), अश्विनी सानप (पोलीस उपायुक्त, सोलापूर, मुख्यालय), एस.एस.घार्गे (पोलीस उपायुक्त, अमरावती शहर), एस.एस.पाटील (पोलीस अधीक्षक, सीआयडी पुणे) एस.बी.उमप  (पोलीस उपायुक्त, नवी मुंबई),एस.बी.जाधव (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर) एस.एस.मेंगडे (पोलीस उपायुक्त, नवी मुंबई) बी.के.गावराणे (पोलीस उपायुक्त, अमरावती शहर)