News Flash

मुंबईच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

दिवसभरात १,०९२ बाधित, १७ जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या एक हजाराच्यावर गेली आहे. शनिवारी १,०९२ रुग्ण आढळले, तर १७ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या दोन दिवसांपासून हजाराच्या पुढे करोनाबाधित आढळून येत आहेत. शनिवारी १,०९२ नवीन रुग्ण आढळले, तर १०५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ९२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ९,३२५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शनिवारी १७ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या शुक्रवारच्या तुलनेत वाढली आहे. मृतांमध्ये १२ पुरुष व पाच महिला होत्या.

मुंबईतील रुग्णवाढीचा दरदेखील ०.२३ वरून ०.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी हा २८० दिवसांपर्यंत खाली आला आहे. टाळेबंद चाळी, झोपडपट्टय़ा आणि इमारतींची संख्या मात्र घटली आहे. सध्या ३६२ प्रतिबंधित क्षेत्रे आहेत, तर ३९२९ इमारती प्रतिबंधित आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ७१० नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ७१० करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख २२ हजार ९१२ वर पोहोचली आहे. दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला असून, करोनाबळींची संख्या ५ हजार ५९२ इतकी झाली आहे.

जिल्ह्य़ात शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १९६, नवी मुंबई १६९, कल्याण-डोंबिवली शहर १४९, ठाणे ग्रामीण ५४, मीरा-भाईंदर ४४, बदलापूर ४२, उल्हासनगर २१, अंबरनाथ १९ आणि भिवंडीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये नवी मुंबईतील ४, ठाणे शहर ३, ठाणे ग्रामीण २ आणि कल्याण-डोंबिवलीतील एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ५,७६० रुग्णांची नोंद झाली असून, ६२ जणांचा मृत्यू झाला.

दिवसभरात नाशिक जिल्हा ३५०, नगर जिल्हा ३०८, पुणे शहर ४५६, पिंपरी-चिंचवड १८५, उर्वरित पुणे जिल्हा २७२, नागपूर शहर ३२३ रुग्ण आढळले.

पुणे जिल्ह्य़ात दिवसभरात ९१३ नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक सतर्क  झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 12:29 am

Web Title: mumbai patient population rises again abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पालिका कर्मचाऱ्यांची आता चेहरा दाखवून हजेरी
2 राष्ट्रीय उद्यानात आज आणखी एका वाघिणीचे आगमन
3 महापालिका निवडणुका फेब्रुवारीत?
Just Now!
X