मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार बुधवारी दिवसभर कायम राहिल्यानं मुंबई ठप्प झाली. रस्ते, रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली. तर अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी घरांमध्ये घुसले होते. ग्रँट रोड, परळ, वरळी, एलफिन्स्टन हे भाग पाण्याखाली गेले. या भागांतील बैठय़ा घरांमध्ये आणि इमारतींच्या तळमजल्यांवर असलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. पाणी साचल्याच्या मुद्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेकडे सवाल उपस्थित केला आहे. त्याचबरोबर तत्कालीन आयुक्तांनी केलेला नालेसफाईच्या दाव्यावरूनही टोला लगावला आहे.

हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्यामुळे सखल भागातील रहिवासी आधीच सावध होते. मात्र दिवसभर फारसा न कोसळलेला पावसाचा जोर मध्यरात्री दोन वाजेनंतर प्रचंड वाढला. त्यामुळे सखल भाग अवघ्या तासाभरातच पाण्याखाली गेला. मुंबईत अनेक घरांमध्येही पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्यानंतर आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा- तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला ‘गिनी पिग’ बनवू नका; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

“पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका? नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास एव्हढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा?,” असं शेलार यांना म्हटलं आहे.

“हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? ११६ टक्के नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग, मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?,” असं विचारत शेलार यांनी प्रश्नांचा पाऊसच शिवसेनेवर पाडला.

आणखी वाचा- मुंबईची झाली तुंबई, खरंच त्यांनी करुन दाखवलं; दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

दक्षिण मुंबईत विशेषत: ग्रँट रोड, मशीद बंदर येथे तर मध्य मुंबईत भायखळा, नागपाडा, दादर, वरळी, नायगाव या परिसरांत २४ तासांत ३०० मिलिमीटर अधिक पाऊस पडला. गेल्या तीस वर्षांत जिथे पाणी भरले नाही, अशा भागांत चार आणि पाच ऑगस्टला पाणी भरले होते.