मुंबई : करोनाबाधितांचा आकडा जसजसा वाढतो आहे तसतसे दर दिवशी होणाऱ्या मृतांचे प्रमाणही वाढत आहे. मृत्युदर ३.३ टक्के  असला तरी रविवारी दिवसभरात ६१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांचा एकूण आकडा १६३६ वर गेला आहे. तर १४२१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ४८,५४९ वर गेला आहे.

मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. एकूण बाधितांचा आकडा ५० हजाराच्या जवळ पोहोचतो आहे. मुंबईतील मृत्युदर कायम असला तरी जसा आकडा वाढतो आहे तशी मृतांची संख्याही वाढते आहे. दुसऱ्या बाजूला रविवारी आणखी ७४८ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले.

दरम्यान, करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे. रविवारी १२१८ रुग्णांना घरी पाठवण्यात आले. तर आतापर्यंत २१,१९६ रुग्ण करोनामुक्त झाले असून २५,७१७ रुग्ण सक्रिय आहेत.

‘त्यांना’ डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही

बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींना घरीच अलगीकरण केले असेल अशा व्यक्तींना लक्षणे दिसू लागल्यास त्यांची घरीच चाचणी करता येणार आहे. कोणत्याही खासगी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्यांना प्रयोगशाळेत थेट संपर्क साधून चाचणी करून घेता येणार आहे. बाधित रुग्णाचे नाव देऊन आपण त्या रुग्णाचे निकट संपर्क आहोत, असे स्वप्रमाणित पत्र प्रयोगशाळेला द्यावे लागणार आहे.

ठाणे जिल्ह्यात ४७७ नवे रुग्ण, तर १४ जणांचा मृत्यू

ठाणे :  ठाणे जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात ४७७ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ११ हजार ३५९ इतकी झाली आहे. रविवारी ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर, जिल्ह्य़ात एका दिवसांत १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ३६६ इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील रविवारी दिवसभरात ४७७ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील १३८, नवी मुंबईतील ११५, कल्याण-डोंबिवली शहरातील २९, भिवंडी शहरातील १८, अंबरनाथ शहरातील ३३, उल्हासनगर शहरातील ८३, बदलापूर शहरातील १७, मीरा-भाईंदर शहरातील ३४ आणि ठाणे ग्रामीणमधील १० रुग्णांचा समावेश आहे. रविवारी जिल्ह्य़ात १४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये मीरा-भाईंदरमधील ४, ठाणे शहरातील ३, कल्याणमधील ३, उल्हासनगरमधील ३ आणि नवी मुंबई शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

ठाण्यात केंद्रीय पथकाची पाहणी

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून दररोज शंभरहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून येत असतानाच, रविवारी सकाळी केंद्रीय आरोग्य पथकाने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, करोना रुग्णालये आणि करोना काळजी केंद्राची पाहणी करून उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच ‘ग्लोबल इम्पॅक्ट हब’ येथे उभारण्यात येत असलेल्या एक हजार खाटांच्या रुग्णालयाची पाहणी केली.

सनदी अधिकारी कुणाल कुमार यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने रविवारी सकाळी ठाणे शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. सुरुवातीला मुंब्रा प्रभाग समितीमधील प्रतिबंधित क्षेत्र, घरोघरी करण्यात येणारे ताप सर्वेक्षण, कोव्हिड योद्धा याबाबत पथकाने माहिती घेतली. तसेच कौसा येथील मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडासंकुलात उभारण्यात येत असलेल्या एक हजार खाटांच्या कोव्हिड रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर पथकाने लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात भेटी दिल्या. भायंदरपाडा येथील कोव्हीड काळजी केंद्र आणि विलगीकरण कक्षात जाऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. या पथकासोबत महापालिका आयुक्त विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख आणि संजय हेरवाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पनवेलमध्ये २२ जणांना संसर्ग

पनवेल तालुक्यामध्ये रविवारी नवे २२ करोनाबाधित आढळून आले. यात पालिका क्षेत्रात १९ तर ग्रामीण भागात तीन रुग्ण आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये कामोठे येथील ४८ वर्षीय महिला व नवीन पनवेल येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. पालिका क्षेत्रात आतापर्यंत ७१२ करोना रुग्ण आढळले असून ४२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

वसईत २४ रुग्ण

वसई-विरार शहर आणि परिसरात रविवारी करोनाचे २४ रुग्ण आढळून आले तर ३६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता १ हजार ७७ झाली असून करोनामुक्त रुग्णांची संख्या ५२५ एवढी झाली आहे. आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे. वसईच्या ग्रामीण भागात १ रुग्ण आढळला असून एकूण रुग्णसंख्या ५० एवढी झाली आहे.

नवी मुंबईत रुग्णवाढीचा वेग वाढला

नवी मुंबई : नवी मुंबईत रविवारी ११५ नवे करोना रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची संख्या २ हजार ८८६ झाली आहे. शहरात रुग्ण वाढीचा वेग वाढला असून काही दिवसांपासून दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण सपाडत आहेत.

उपायुक्तांना नोटीस

करोना संशयितांसाठी पनवेल येथील इंडिया बुल येथे विलगीकरण केंद्र केले असून तेथील व्यवस्थेबाबत व शिक्षण विभागातील कामातील हलगर्जीपणाबद्दल पालिकेचे उपायुक्त नितीन काळे यांना आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.