मुंबईत करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ लागली असून सोमवारी दिवसभरात ९७० जणांना करोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालावरुन स्पष्ट झाले. मुंबई महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे रुग्ण दुप्पट्टीचा काळ ७८ दिवसांवर पोहोचला आहे. एकूण करोना रुग्ण वाढीचा दर ०.८९ टक्के झाला आहे.

मुंबईत मागील २४ तासांत ४६ करोनाबाधितांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत मुंबईतील एक लाख १७ हजार ४२१ जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ९० हजार ८९ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी बऱ्या झालेल्या १,७९० जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत सहा हजार ४९० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

आजघडीला मुंबईत २० हजार ५४६ उपचाराधीन रुग्ण असून ते विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.

राज्यात ८,९६८ नवे रुग्ण

राज्यात सोमवारी करोनाच्या ८,९६८ रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या साडेचार लाखांपेक्षा अधिक झाली आहे.  अनेक दिवसांनंतर पुण्यातील रुग्णसंख्या काही प्रमाणात घटली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनामुळे २६६ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात  पुण्यात ७९६, पिंपरी-चिंचवडमध्ये ७३१ रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्यात आणखी १,३२८रुग्ण

ठाणे : जिल्ह्यात सोमवारी १ हजार ३२८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ९० हजार १५४ इतकी झाली आहे. सोमवारी ३४ जणांचा करोनामुळे मृत्यु झाल्याची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २ हजार ४८१ इतकी झाली आहे.

सोमवारी नोंदल्या गेलेल्या करोना रुग्णांत नवी मुंबईतील ३१९, कल्याण-डोंबिवली शहरातील २७४, ठाणे शहरातील २६७, ठाणे ग्रामीणमधील १४०, मीरा-भाईंदरमधील १२९, बदलापूरमधील ६३, उल्हासनगरमधील ५९, अंबरनाथमधील ५५ आणि भिवंडीतील २२ जणांचा समावेश आहे. तर, सोमवारी नोंदल्या गेलेल्या मत्यूंमध्ये कल्याण-डोंबिवलीमधील १० तसेच ठाणे, उल्हासनगर आणि  अंबरनाथमधील प्रत्येकी चार, नवी मुंबई, भिवंडी, मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीणमधील प्रत्येकी तीन रुग्णांचा समावेश आहे.