26 January 2020

News Flash

खोल जखमेवर मुंबई विद्यापीठाची तोंडदेखली मलमपट्टी

दुरवस्थेत असलेल्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात विद्यार्थ्यांची सुरक्षा, पुस्तकांचे अस्तित्त्व धोक्यात

दुरवस्थेत असलेल्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात विद्यार्थ्यांची सुरक्षा, पुस्तकांचे अस्तित्त्व धोक्यात

मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ऑगस्ट २०१८ मध्ये ग्रंथालयातील भाषा विभागाला टाळे लागले. भारतातील प्रादेशिक भाषांसह आंतरराष्ट्रीय भाषेतील अडीच लाख पुस्तकांचा संग्रह असलेले भाषा विभाग आजही धूळ खात पडलेले आहे. एक वर्ष उलटून गेले तरी तेथील पुस्तकांची अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. त्यातच दोन आठवडय़ांपूर्वी येथील मुलींच्या स्वच्छतागृहातील स्लॅब कोसळल्यामुळे या इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले असतानाही विद्यापीठ प्रशासनाने त्या इमारतीचा ताबा घेण्यात दिरंगाई चालवली आहे.

भाषा विभागातील पुस्तके  मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासह शिक्षक आणि साहाय्यक ग्रंथपालांनाही जीव धोक्यात घालून तिथे जावे लागते. भाषा विभागच नव्हे तर अशा पद्धतीच्या पडझडीमुळे इमारतीचा ‘ड’ भाग बंद ठेवण्यात आला आहे. इमारतीचे कोपरे आणि स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत असून ओल्या झालेल्या भिंतींवरही शेवाळे आले आहे. अनेक ठिकाणी छत गळत आहे. अशी बिकट अवस्था असतानाही विद्यापीठ प्रशासन के वळ वरवर रंगकाम करून भोंगळ कारभाराला लपवण्याचा प्रयन्त करत आहे.

जुन्या इमारतीत के वळ ग्रंथालय नसून विद्यार्थी इथे अभ्यासासाठी बसतात. ग्रंथालय शास्त्र विभागही याच इमारतीत असल्याने त्या विभागाचे वर्ग इथे सुरू असतात. ग्रंथालय शास्त्राच्या तसेच अभ्यासासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी वारंवार लेखी अर्ज करूनही विद्यापीठाने याची दखल घेतली नाही. या संदर्भात प्रभारी ग्रंथपाल बी. के . आहिरे यांच्याकडे विचारणा के ली असता विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाकडे बोट दाखवत त्यांनी आपले हात झटकले, तर अभियांत्रिकी विभागाशी संपर्क  साधला असता, जनसंपर्क  विभागाशी संपर्क  साधण्याचा सल्ला देत, आम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची परवानगी नाही, असे उत्तर अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख विनोद पाटील यांनी दिले.

‘सातत्याने पडझड सुरू असल्याने आम्हाला इथे यायचीही भीती वाटते; परंतु वर्ग इथेच होत असल्याने नाइलाजास्तव यावे लागते. विशेष म्हणजे भाषेशी निगडित पुस्तक मिळवताना मोठी कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर विद्यापीठ सुधारणा करणार आहे का,’ असा प्रश्न येथे येणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

स्थलांतराची चाचपणी

विद्यानगरीतील जुन्या ग्रंथालय इमारतचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून अहवाल बांधकाम समितीकडे पाठवण्यात आला आहे. इमारतीमधील भाषा विभाग सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवला असला तरी गरजेनुसार येथील पुस्तके  विद्यार्थ्यांना दिली जातात, असा दावा विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख डॉ. लीलाधर बनसोड यांनी केला. ‘विद्यापीठातील नवीन ग्रंथालयाचे काही काम अपूर्ण असल्याने ते पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करत आहे. नवीन इमारतीमधील जागेच्या उपलब्धतेनुसार जुने ग्रंथालय अंशत: हलविता येईल का याची चाचपणी के ली जात आहे,’ असेही ते म्हणाले.

 

First Published on August 14, 2019 12:33 am

Web Title: mumbai university jawaharlal nehru library mpg 94
Next Stories
1 गणेश आगमन मिरवणुकीतील बेशिस्त आवरा!
2 अपंगांच्या डब्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचीही घुसखोरी
3 भूमिगत वाहनतळाच्या सुधारित धोरणाला मंजुरी
Just Now!
X