निकालांना आठवडाभर विलंब; राज्य शासनाची माहिती

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावे, असे स्पष्ट निर्देश राज्यपाल आणि कुलपती सी. विद्यासागर राव यांनी दिले असले तरी या मुदतीत सर्व निकाल लागण्याची शक्यता नाही. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल आठवडाभर विलंबाने लागतील, असे शासनाच्या वतीने शुक्रवारी सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत सूचित करण्यात आले.

विधान परिषदेत संजय दत्त आणि शरण रणपिसे यांच्या लक्षवेधीवर दोन दिवसांपूर्वी सविस्तर चर्चा झाली होती. तरीही सदस्यांनी काही शंका व्यक्त केल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, खात्याचे सचिव सीताराम कुंटे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची आमदारांबरोबर संयुक्त बैठक आयोजित केली होती. निकाल जाहीर होण्यास का विलंब झाला याचे सादरीकरण कुलगुरूंनी बैठकीत केले.

३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील का, अशी विचारणा सभापती निंबाळकर आणि अन्य सदस्यांनी केली असता या संदर्भात जास्तीत जास्त निकाल या मुदतीत लावण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. वाणिज्य, कला आणि विधि विभागाचे निकाल ३१ तारखेनंतर व ७ ऑगस्टच्या आत जाहीर केले जातील, असे सूचित करण्यात आले.

निकाल विलंबाने जाहीर होणार असले तरी मूल्यांकनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ देऊ नका, अशी मागणी सर्वच सदस्यांकडून बैठकीत करण्यात आली. नव्या यंत्रणेने उत्तरपत्रिका तपासताना हा गोंधळ होऊ शकतो याचा अंदाज आला नव्हता का, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती कुलगुरूंवर करण्यात आली. परीक्षा पार पडल्यावर किती उत्तरपत्रिका तपासून झाल्या याचा दैनंदिन आढावा का घेण्यात आला नाही, असाही सवालही कुलगुरूंना करण्यात आला.

कुलगुरूंना राजीनामा देण्यास भाग पाडणार?

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा झालेला घोळ लक्षात घेता राज्य सरकार कुलगुरू डॉ. देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे. निकालांचा सारा घोळ मिटल्यावर त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल, असे एका मंत्र्याने सूचित केले. डॉ. देशमुख यांच्यावर भाजपच्या एका बडय़ा नेत्याचा वरदहस्त असल्याने मंत्र्यांची इच्छा असली तरी ते प्रत्यक्षात येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते.

मंगळवारी विद्यापीठाला घेराव

३१ तारखेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. देशमुख यांनी दिले होते. या मुदतीत सर्व निकाल जाहीर न झाल्यास १ तारखेला मुंबई विद्यापीठाला घेराव घालण्याचा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. तसेच या साऱ्या गोंधळास जबाबदार असणारे कुलगुरू डॉ. देशमुख यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणीही निरुपम यांनी केली. निकालाचे काम दिलेल्या कंपनीशी भाजपच्या नेत्यांचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.