धमकावून पैसे उकळण्याच्या सवयीस कंटाळलेला ग्राहक आरोपी

मुंबई : पोलीस तक्रार करण्याची धमकी देत पैसे आणि शरीरसुखासाठी धमकावल्याने देहविक्री करणाऱ्या महिलेची तिच्या ग्राहकाने हत्या केली. वांद्रे-कु र्ला संकुल पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या हत्याप्रकरणाचा छडा लावत आरोपी तरुणास अटक केली.

वांद्रे-कु र्ला संकु लातील मोतीलाल नगर येथील नाल्यात ११ मे रोजी या महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळला. हल्लेखोराने धारदार हत्याराने महिलेचा गळा कापला होता. तसेच तिच्या पोटातही भोसकल्याच्या दोन ते तीन जखमा आढळल्या. महोम्मद कलीम शेख ऊर्फ इम्रान असे या तरुणाचे नाव आहे. कुर्ला स्थानकाजवळ मृत महिला वास्तव्यास असलेल्या परिसरात इम्रान राहत होता. काही महिन्यांपूर्वी दोघांची ओळख झाली. तो या महिलेचा ग्राहक बनला. मात्र महिलेने पोलीस ठाण्यात खोटी तक्रार करण्याची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली. हत्येच्या दिवशी इम्रानचा पगार झाला होता. ती सर्व रक्कम महिलेने हिसकावली, अशी माहिती आरोपी इम्रानने पथकाला दिली. हत्येच्या दिवशी दोघे भेटले असता त्यांनी मद्य घेतले. ही संधी साधत मद्याच्या अंमलाखाली असलेल्या महिलेची इम्रानने हत्या केली. हत्येसाठी वापरलेला चाकू  या पथकाने हस्तगत केला.

मृतदेहावरील कपडय़ांची अवस्था पाहून प्रथमदर्शनी पोलिसांना शारीरिक अत्याचार किंवा तसा प्रयत्न करण्यात आला असावा, असा संशय होता. मात्र शवचिकित्सा अहवालानुसार हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक हत्याचार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, वरिष्ठ निरीक्षक सचिन राणे यांच्या मार्गदर्शनाखालील निरीक्षक प्रदीप मोरे, कन्हैयालाल शिंदे, सहायक निरीक्षक सदाशिव सावंत, उपनिरीक्षक विनायक पानमंद आणि पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू के ला. मृतदेहाची ओळख लागलीच पटल्याने महिलेचा पेशा, तिच्या वास्तव्याचे ठिकाण आदी तपशील पथकाला मिळाले. महिलेचा पती, देहविक्री करणाऱ्या अन्य एका महिलेचा पती, परिसरातील एका व्यावसायिक इमारतीचा सुरक्षारक्षक हे तिघे संशयितांमध्ये होते. घटनास्थळाजवळील एका व्यावसायिक इमारतीच्या सीसीटीव्हीत कै द झालेल्या चित्रणात हत्येपूर्वी मृत महिला एका व्यक्तीसोबत नाल्याच्या दिशेने जाताना आढळली. मात्र हे चित्रण अस्पष्ट होते. या चित्रणात महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच्या चालण्याची ढब आणि कपडय़ांच्या आधारे पथकाने शोधाशोध सुरू

केली. संशयितांच्या चालण्याची, धावण्याची ढब तपासण्यात आली.  नंतर पोलिसांना आणखी एका ठिकाणावरील सीसीटीव्ही चित्रण सापडले. त्यात मृत महिलेसोबत असलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसला. संशयितांपैकी एकाने त्यास ओळखले. त्याआधारे पथकाने या व्यक्तीस ताब्यात घेतले.