प्रियकरासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचे काय परिणाम होऊ शकतात याची सुशिक्षित तरुणी वा स्त्रीला चांगली जाणीव असते. त्यामुळे परस्पर संमतीने स्थापन केलेल्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने बुधवारी सोलापूर येथील एका २५ वर्षांच्या तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

२४ वर्षांच्या तरुणीशी आपले प्रेमसंबंध होते. परंतु तिच्याशी फारकत घेतल्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात तिने गोरेगाव पोलिसांत आपल्याविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता, असा दावा करत या तरुणाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर या तरुणाच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळेस या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून सदर तरुणीशी लैंगिक संबंध स्थापन केले. शिवाय हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना लैंगिक संबंधांसाठी  तो बळजबरी करत असे. नकार दिल्यावर तो मारहाण करत असे. एवढेच नव्हे, तर मे २०१५ मध्ये तिला गर्भधारणा झाल्यावर या तरुणाने तिच्यावर दबाव टाकून तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच त्यानंतर तिच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले, असा दावा तरुणीच्या वतीने करण्यात येऊन तरुणाच्या याचिकेला तीव्र विरोध करण्यात आला.

परंतु, न्यायालयाने तरुणीचा दावा फेटाळून लावला. अशा प्रकरणांमध्ये म्हणजेच जेथे लैंगिक संबंध हे परस्पर संमतीने स्थापन केलेले आहेत त्याला बलात्कार म्हणता येऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. आपल्या समाजात याबाबत काही समजुती आहेत हे मान्य केले तर आधुनिक संस्कृतीचा विचार करता असे संबंध परस्पर संमतीने प्रस्थापित केलेले असतात. जेव्हा एखादी तरुणी वा स्त्री सुशिक्षित आणि परिपक्व असेल तर ती अशा संबंधांना नाही म्हणू शकते. परंतु ती जेव्हा त्याला विरोध करत नाही याचा अर्थ संबंधित तरुण-तरुणीमधील लैंगिक संबंध हे परस्पर संमतीने आहेत, असेही न्यायालयाने म्हटले. दरम्यान, या तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्याला या तरुणीला वा तिच्या कुटुंबियांशी कुठलाही संपर्क न साधण्याची अट घातली आहे.