मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी आपल्या खास ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज लाँच करण्यासाठी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज यांनी आपल्या खास शैलीत नरेंद्र मोदी यांना चिमटे काढले. एखाद्याने किती खोटं बोलावं याला मर्यादा असतात. तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, ते सोडून सध्या भाषणंच ऐकायला मिळत आहेत. गेली ६७ वर्षे हा देश भाषणंच ऐकत आलाय. त्यामुळे आणखी किती काळ लोकांना भाषणच ऐकायची, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेला दिलेल्या आश्वासनांचा मोदींना विसर पडला आहे, हे सांगताना राज यांनी उपस्थितांना एक विनोदी किस्सा सांगितला. यामध्ये राज यांनी ‘थापा’ या शब्दाचा विनोदी पद्धतीने वापर करत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेले मोदी हे ‘थापा’ आहेत, असे राज यांनी म्हटले. राज यांच्या या विधानाने सभागृहात प्रचंड हशा पिकला. त्यानंतर राज यांनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन, भाजपच्या अंगलट आलेला सोशल मीडियावरील प्रचार आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर चौफेर टीका केली.

सत्तेत आल्यापासून सरकारकडून एखाद्या गोष्टीचा भपका निर्माण करायचा आणि नंतर ती गोष्ट विसरून जायची, हाच उद्योग सुरू आहे. मोदींनी निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात आणेन आणि प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये जमा करेन, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे जनतेने काहीतरी चांगलं घडले, या आशेने देश तुमच्या हातात दिला होता. मात्र, अजूनही एकही गोष्ट सत्यात उतरताना दिसत नाहीये. त्यानंतर मोदींनी सातत्याने ‘मेक इन इंडिया’, ‘योगा दिवस’, ‘स्वच्छ भारत’ अशी काही ना काही नवी टूम काढत आहेत. त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षांमध्ये नोटांचा रंग सोडला तर काहीच बदलले नाही, अशी टीका राज यांनी केली.

मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सर्वप्रथम मीच सांगितले होते. मात्र, आता ती गोष्ट भुतकाळ झाला आहे. त्यामुळेच मोदींच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध करणारी पहिली व्यक्तीदेखील मीच होतो. जास्तीत जास्त अंतर कमीत कमी वेळेत पार करण्यासाठी बुलेट ट्रेनचा वापर होणे अपेक्षित आहे. याचा विचार करता मुंबई-दिल्ली, मुंबई-कोलकाता किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी बुलेट ट्रेन सुरू करणे व्यवहार्य ठरले असते. मात्र, अहमदाबाद ते मुंबई हे अंतर दोन तासांमध्ये पार करण्यासाठी एक लाख कोटींचा चुराडा करण्यात काय अर्थ आहे? यामागील छुपे हेतू आम्हाला कळत नाहीत का? ही बुलेट ट्रेन केवळ गुजरात आणि मुंबईतील गुजराती लोकांच्या सोयीसाठी उभारलेला प्रकल्प आहे. या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या मूळावर घाव घालणाऱ्या आहेत. मात्र, मराठी मराठी माणसाला नख लावाल तर मी महाराष्ट्रभर धिंगाणा घालेन, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेत्यांवरही आसूड ओढले. भाजपमधील मराठी नेते केवळ हुजरे आहेत. त्यांना अनेक वर्षांनी मिळालेल्या सत्तेचे अप्रूप आहे. त्यामुळेच ते मराठी माणसाचं अस्तित्त्व धोक्यात आणणाऱ्या बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांच्या मुद्दयावर गप्प बसले आहेत. हाच पैसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी वापरायला पाहिजे होता, असे राज यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यभरात सरकारने ३० हजार विहिरी बांधल्या असा प्रचार केला जात आहे. मात्र, त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर पडलेले खड्डेही विहिरी म्हणून गृहीत धरले आहेत का, असा खोचक सवाल राज यांनी विचारला.