कोणतीही गुंतवणूक करताना जोखीम तपासावी. परताव्याचे निश्चित ध्येय असावे, उपलब्ध तरलताही लक्षात घ्यावी. आपले उत्पन्न, गरज आणि कर कार्यक्षमतेत समन्वय साधण्याचे कसब गुंतवणूकदारांनी अंगीकारावे, असे मार्गदर्शन तज्ज्ञ कर सल्लागारांनी मंगळवारी ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या मंचावरून केले. कायद्याचे अनुपालन आणि जोखीम – परताव्यातील अभ्यास हेही गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक ठरते, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

गुंतवणूक साक्षरतेवर भर देणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या गुंतवणूकपर मार्गदर्शन पर्वातील दुसरे सत्र दूरचित्रसंवाद माध्यमातून पार पडले. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सहप्रायोजित या कार्यक्रमात सनदी लेखापाल आणि करविषयक सल्लागार प्रवीण देशपांडे आणि दीपक टिकेकर यांनी सादरीकरणाद्वारे सहभाग घेतला. तसेच आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदार संपर्कचे क्षेत्रीय व्यवस्थापक शैलेंद्र दीक्षित यांनी म्युच्युअल फंड क्षेत्रातील जाणकार म्हणून कर विषयानुरूप वाचक, गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसन केले. सुनील वालावलकर यांनी सहभागी वक्ते व गुंतवणूकदारांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली.

केंद्रीय अर्थसंकल्प तसेच तत्पूर्वीच्या, करोना-टाळेबंदीदरम्यान जाहीर झालेल्या सरकारच्या घोषणांना ‘मिनी बजेट’ संबोधित प्रवीण देशपांडे यांनी करविषयक विविध तरतुदींचे   स्पष्टीकरण या वेळी दिले. या तरतुदींची वैशिष्ट्ये नमूद करत देशपांडे यांनी कर नियमातील बदल, त्याचे परिणाम स्पष्ट केले. करांबाबत कायद्यात वेळोवेळी बदल होत असतात; बचतीनुसार करमात्राही भिन्न अशी असते, असे सांगून देशपांडे यांनी करविषयक गुंतवणूकदारांची अर्थसाक्षरता वाढणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

दीपक टिकेकर यांनी विविध कर सवलतींद्वारे होणाऱ्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय मांडले. विविध वयोगटांसाठी असलेल्या गुंतवणुकीच्या पर्यायासह त्यावरील करदायित्वही त्यांनी या वेळी नमूद केले. कर नियोजन हे आर्थिक नियोजनाच्या टप्प्यातील महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. स्थावर मालमत्ता, बँक, फंड अशा विविध पर्यायांतील कर मात्रेबाबतची काही उदाहरणे त्यांनी नमूद केली.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे शैलेंद्र दीक्षित यांनी, म्युच्युअल फंड व कर रचनेची सांगड घालतानाच गुंतवणूकदारांना अधिक परताव्याद्वारे नियोजनबद्ध आखणी करण्याचे आवाहन या वेळी केले. समभाग, रोखे, समभाग संलग्न योजना अशा विविध पर्यायांना कर सवलतीची जोड असल्याचे त्यांनी नमूद केले. गुंतवणूक व परतावा यांचा विचार करताना दीक्षित यांनी परिणामकारक कर नियोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ उपलब्ध

अर्थसंकल्पाच्या सखोल विश्लेषणासह गुंतवणुकीवर भर देणाऱ्या लेखांचा खजिना असणारा ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ हा वार्षिक अंक गेल्या बुधवारी (१० मार्च) प्रकाशित करण्यात आला. गुंतवणूकदारांना मार्गदर्शक ठरणारा हा अंक सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.