31 October 2020

News Flash

‘कॉल’ लावण्यासाठी एक किमीचा प्रवास!

विशेष म्हणजे, मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याचा फटका परिसरातील आरोग्यसेवेलाही बसला आहे.

 

परळ भागातील डॉल्फिन मोबाइलधारकांची ‘नेटवर्क’अभावी पायपीट

मोबाइलशिवाय राहणे हे आजमितीस अनेकांना अवघड झाले आहे. अनेक महत्त्वाचे व्यवहार मोबाइलवर अवलंबून आहेत. असे असतानाच गेल्या १५ दिवसांपासून परळ परिसरातील सरकारी एमटीएनएलच्या डॉल्फिनची सेवा बंद आहे. यामुळे एकविसाव्या शतकातही येथील ‘एमटीएनएल’च्या मोबाइलधारकांना फोन करण्यासाठी अर्धा किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे. विशेष म्हणजे, मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याचा फटका परिसरातील आरोग्यसेवेलाही बसला आहे.

परळ नाका, परळ रेल्वे स्थानक, एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक परिसरात डॉल्फिनचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे ही सेवा वापरणाऱ्या परिसरातील हजारो वापरकर्त्यांना याचा फटका बसत आहे. अनेक जण दिवसातून एक वेळा केवळ फोन करण्यासाठी परळ नाका ते माटुंगा किंवा केईएम रुग्णालय परिसराच्या पुढे जात आहेत. या परिसरात केईएम, टाटा, वाडिया ही रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत राज्यातील तसेच परराज्यातून अनेक लोक येत असतात. यातील बहुतांश लोकांकडे बीएसएनएलचे सिम कार्ड असते. या वापरकर्त्यांना मुंबईत डॉल्फिनची सेवा मिळते. पण या परिसरात रेंजच येत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही त्रस्त झाले आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिक धनाजी राणे व इतर सिम कार्ड धारकांनी एमटीएनएलकडे तक्रार केली असता त्यांना तेथे दाद देण्यात आली नाही. अखेर राणे आणि इतर नागरिकांनी एमटीएनएलच्या १५०३ या क्रमांकावर तक्रार नोंदविली. तेथे तक्रार नोंदविल्यानंतरही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्रमांक मागितले. यानंतर राणे यांना सुमारे पाच ते सहा क्रमांक देण्यात आले. दरम्यानच्या काळात वापरकर्त्यांना तुमच्या सिमकार्डमध्ये तांत्रिक अडचणी असतील असे सांगत सिमकार्ड बदलण्यास सांगितले. त्यानुसार सर्वानी कार्डाची रक्कम भरून कार्डही बदलले. तरीही रेंज येत नसल्यामुळे अखेर त्यांनी उपलब्ध दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नसल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच तेथील अधिकाऱ्यांकडून कोणतेही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा लागणार, असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या संदर्भात एमटीएनएलचे अधिकारी जी. व्ही. आर. एस. कुमार यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांना पाठविलेल्या लघु संदेशालाही त्यांनी उत्तर दिले नाही.

आरोग्यसेवेला फटका

परळ परिसरात अनेक महत्त्वाची रुग्णालये असून रक्तपेढय़ाही आहेत. या रक्तपेढय़ांमध्ये काम करणारे कर्मचारी आणि संबंधित मंडळींकडे डॉल्फिनचे क्रमांक आहेत. यामुळे अनेक रुग्णांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे रक्त मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निरीक्षणही राणे यांनी नोंदविले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2016 2:34 am

Web Title: network issue in parel
Next Stories
1 मोबाइल क्रमांक जाहीर केल्याने अभियंते चिडले!
2 खासदार-आमदारांच्या दबावापुढे मुख्यमंत्र्यांची माघार; ई- टेंडरिंगसाठी दहा लाखांची मर्यादा
3 बाणगंगेच्या दगडी पायऱ्यांच्या दुरुस्तीत पावसाचा अडथळा
Just Now!
X