विरार-वसई-पनवेल मार्गावर ११ नवीन स्थानके; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा

मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने एमयूटीपी- ३ या योजनेला मंजुरी दिल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) पाठवलेल्या आणखी एका प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. विरार-वसई-पनवेल यादरम्यान उपनगरीय वाहतुकीसाठी दुहेरी रेल्वेमार्ग बांधण्याचा प्रस्ताव २१ डिसेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता असून त्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ डिसेंबर रोजी त्यांच्या मुंबई दौऱ्यात करतील. सत्तर किलोमीटर लांबीच्या या नव्या मार्गावर ११ नवीन स्थानके उभी राहणार असून मध्य रेल्वेवरील डोंबिवली या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकाच्या बाजूला ‘नवी डोंबिवली’ या स्थानकाचाही त्यात समावेश आहे.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी एमआरव्हीसीने विविध प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे पाठवले आहेत. त्यांपैकी विरार-वसई-पनवेल या ७० किमीच्या दुहेरी रेल्वेमार्गाचा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या ७० किमीच्या प्रकल्पात २३ स्थानकांचा समावेश असून त्यापैकी ११ स्थानके नव्याने बांधण्यात येणार आहेत. दिवा-वसई आणि दिवा-पनवेल या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गाच्या बाजूनेच हा नवीन मार्ग तयार होणार असून त्यासाठी ९००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिली.

[jwplayer p7M2MFoq]

उपनगरीय रेल्वेबरोबरच रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी एमआरव्हीसीने विरार-वसई-पनवेल-पेण-अलिबाग या प्रकल्पाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. हा प्रकल्प दोन टप्प्यांत होणार असून त्यापैकी विरार-वसई-पनवेल या टप्प्याला निती आयोगाची मंजुरी मिळाली असून आता हा प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. बुधवार, २१ डिसेंबर रोजी हा प्रकल्प मंजूर होण्याची शक्यता असून २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मुंबई दौऱ्यात त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. या मार्गाचे काम झाल्यास पनवेलहून पश्चिम रेल्वेला जाण्यासाठी गाडी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे डोंबिवली, कोपर येथून पश्चिम रेल्वेमार्गावर जाण्यासाठी उपनगरीय सेवा उपलब्ध होईल. परिणामी मुख्य मार्गावरील गर्दीचा निचरा होणार आहे.

अस्तित्वात असलेली स्थानके

पनवेल, कळंबोली, नवडे रोड, तळोजे पंचानंद, निळजे, कोपर, भिवंडी रोड, खारबाव, कामण रोड, जुचंद्र, वसई रोड, नालासोपारा, विरार.

नवीन स्थानके (११)

नवीन पनवेल, टेंबोडे (पनवेल-कळंबोलीमध्ये), पिंढर (नवडे रोड-तळोजेमध्ये), निघू, निरवली (तळोजे-निळजे यांदरम्यान), नांदिवली (निळजे-कोपरदरम्यान), नवी डोंबिवली, पिंपळास (कोपर-भिवंडी रोडदरम्यान), कलवार, डुंगे (भिवंडी रोड-खारबावदरम्यान), पायेगाव (खारबाव-कामण रोडदरम्यान)

[jwplayer CEDv0Zba]