‘क्राय’ स्वयंसेवी संस्थेचा अहवाल

राज्यातील साधारण नऊ लाख अल्पवयीन मुली या बालकामगार असून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी जवळपास एकतृतीयांश मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहचू शकत नाहीत, असे ‘क्राय’ या संस्थेच्या अहवालातून समोर येत आहे.

एकिकडे शासकीय आकडेवारीनुसार शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या प्रमाणात वर्षोगणिक वाढ होत असताना दुसरीकडे मुली माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहचू शकत नसल्याचे ‘चाईल्ड राईट्स अँड यू’ (क्राय) या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणीतून समोर आले आहे. सर्व जिल्ह्यंमध्ये ही पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार १५ ते १९ या वयोगटातील साधारण ४९ लाख मुली आहेत. त्यातील १८.४ टक्के म्हणजे साधारण नऊ लाख मुली या वेगवेगळ्या स्वरूपांत कामगार म्हणून काम करतात. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.

नंदुरबार, गडचिरोली, जालना, हिंगोली या जिल्ह्यंमधील १५ ते १९ या वयोगटातील ३१ ते ३९ टक्के मुली कामगार आहेत. तर  ठाणे, नाशिक, पुणे, नगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण साधारण ३० टक्के आहे. पर्यायी यातील बहुतेक मुली या शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत.

शेती, वनसंपदा गोळा करणे, मासेमारी ही कामे करण्याचे प्रमाण अधिक आहे. अनियंत्रित क्षेत्रांमध्ये कामगार मुलींची संख्या अधिक असल्याचेही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे माध्यमिक स्तरावर मुलींच्या शाळा गळतीच्या प्रमाणातही वाढ होत असल्याचे या अहवालावरून समोर येत आहे. प्राथमिक शाळांमध्ये नोंदणी झालेल्या मुलींपैकी एकतृतीयांश मुली या माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यासाठी या मुलींच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, या मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, सायकल देणे अशा योजना राबवाव्यात अशा सूचनाही या अहवालात करण्यात आल्या आहेत.