07 July 2020

News Flash

‘निसर्ग’ संकट टळले!

दोघांचा मृत्यू; मुंबईत तीव्रता कमी, रायगड जिल्ह्य़ाचे मात्र नुकसान

अलिबाग

अरबी समुद्रातील निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडक दिली. मुंबई आणि ठाण्याला वादळाचा तडाखा वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी बसला. मात्र, रायगड जिल्ह्य़ात मोठे नुकसान झाले.

अलिबाग तालुक्यात वीजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला. मध्यप्रदेशच्या दिशेने सरकणाऱ्या वादळाची तीव्रता कमी झाली असून त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात रुपांतर झाले.

अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्री वादळ दुपारी साधारण साडेबाराच्या सुमारास आलिबागजवळ धडकले. ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहात होते. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. त्यानंतर मात्र पुढील सहा तासांमध्ये त्याची तीव्रता खूप कमी झाली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे कोसळली. मात्र ते वगळता मोठे नुकसान झाले नाही. वादळ धडकल्यानंतर पुणे आणि नाशिकच्या दिशेने ते सरकले मात्र तोपर्यंत त्याची तीव्रता कमी झाली होती.  सायंकाळी वादळ शमून पुण्याच्या उत्तरेकडे त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्टय़ात आणि रात्री पुढील टप्प्यावर कमी दाबाच्या पटय़ात परिवर्तन झाले. समुद्रात वादळाची तीव्रता अधिक असते. जमीनीवर तीव्रता कमी होत जाते. वादळाच्या प्रवासाचा वेग अधिक होता. त्याचप्रमाणे वादळाच्या केंद्राची कक्षा मोठी होती आणि हवेच्या वरच्या थराची स्थिती वादळासाठी अनुकूल नव्हती त्यामुळे वादळाची तीव्रता कमी होत गेली, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत वादळे धडकण्याचे प्रमाण कमी..

अरबी समुद्रातील वादळे ही केरळ किंवा कर्नाटकजवळ तयार होतात. त्यानंतर बहुतेकवेळा ती ओमान किंवा गुजरातच्या दिशेने सरकल्याचा इतिहास आहे. मुंबईत यापूर्वी १३८ वर्षांपूर्वी म्हणजे १८८२ मध्ये मोठे चक्रीवादळ झाले होते. त्यानंतर आलेल्या काही वादळांचे मुंबईवर परिणाम झाले मात्र, बहुतेक वादळांचा मोठा फटका मुंबईला बसला नाही. नजीकच्या कालावधीत २००९ मध्ये आलेल्या फयान चक्रीवादळाचा मुंबईवर परिणाम झाला. मात्र तेही मुंबईला धडकले नाही तर शहराच्या जवळून सरकले होते. त्यानंतर २०१७ मध्ये ओखी चक्रीवादळाचा ईशारा देण्यात आला होता.  मात्र, त्याची तीव्रता समुद्रातच कमी झाली होती. वायू हे चक्रीवादळही २०१७ ला निर्माण झाले मात्र तेही गुजरातकडे सरकले. अरबी समुद्रावर वातावरणाच्या वरच्या भागांत वारे पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने वाहतात. पश्चिमेच्या दिशेने वाहणारे वारे प्रभावी असल्यास वादळे ओमानच्या दिशेने सरकतात. मात्र प्रवाह क्षीण असल्यास चक्रीवादळे उत्तरेकडे म्हणजे गुजरातच्या दिशेने सरकतात.

दिशा बदलली अन्..

मुंबई, ठाणे, पालघर येथेही वादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, वादळ धडकण्यापूर्वी त्याची दिशा काहीशी बदलली. अंदाजित दिशेपेक्षा ते पन्नास किलोमीटर दक्षिणेकडे वळले. त्याचप्रमाणे वादळाच्या प्रवासाचा वेग खूप जास्त होता. त्यामुळे किनारी भागांत ते फार वेळ राहिले नाही. मुंबई आणि ठाण्यातही वाऱ्यांचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, प्रत्यक्षात वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटर असल्याची नोंद हवामान विभागाने केली.  मुंबई, ठाण्यात झाडे कोसळण्याच्या घटना वगळता कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक हानी..

अलिबाग : चक्रीवादळामुळे रायगडमधील मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले. संपर्क यंत्रणा कोलमडल्या, वृक्ष उन्मळून पडल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. वादळाचा सर्वाधिक तडाखा अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला. पोलादपूर, माणगाव, रोहा, तळा, पेण आणि उरण तालुक्यांतही वादळाचा प्रभाव दिसून आला. अलिबाग तालुक्यातील बंगलेवाडी उमटे येथे दशरथ बाबू वाघमारे यांच्या अंगावर विजेचा खांब पडला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  श्रीवर्धन तालुक्यात झाड अंगावर पडून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रोहा तालुक्यातील सोल्वे कंपनीत भिंत पडल्याची घटना वगळता जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्रात  मोठे नुकसान झाले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 12:26 am

Web Title: nisarga cyclone heavy rains across the state abn 97
Next Stories
1 ‘लोकसत्ता विश्लेषण’मध्ये आज पर्यावरणावर मंथन
2 रेल्वेचे विलगीकरण डबे अद्यापही ‘अलगीकरणा’त
3 वादळामुळे विमान फेऱ्यांवर परिणाम, रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
Just Now!
X