तिकीट दरातील तफावतीमुळे प्रवासी पाठ फिरवणार; वातानुकूलित बससेवेचेही नियोजन कोलमडणार

पालिकेच्या अनुदानावर सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन सेवेला ‘बेस्ट’ दरकपातीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. मुंबईसह नवी मुंबईतील मार्गावर बेस्ट आणि ‘एनएमएमटी’च्या तिकीट दरात मोठी तफावत राहणार असल्याने ‘एनएमएमटी’च्या साध्या बससह वातानुकूलित बसकडे प्रवासी पाठ फिरवतील अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर नवी मुंबई परिवहन प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे.

मुंबई परिवहनच्या बेस्ट सेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने दररोजच्या ४० लाख प्रवाशांची संख्या २१ लाखांवर आली आहे. यामुळे प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी ‘बेस्ट’ परिवहन सेवेच्या भाडय़ात कपात करण्याचे ठरविले आहे. या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे साध्या बसचे भाडे किमान पाच रुपये, तर कमाल २० रुपये राहणार असून वातानुकूलित बसचे किमान भाडे सहा रुपये, तर कमाल भाडे केवळ २५ रुपये होणार आहे. याआधी साध्या बसचे किमान भाडे आठ रुपये आणि कमाल भाडे ५० रुपये होते. वातानुकूलित बसचे किमान भाडे १५ रुपये तर कमाल भाडे १३० रुपये होते.

मात्र याचा मोठा आर्थिक फटका नवी मुंबई परिवहन उपक्रमाला बसणार आहे. सध्या ‘बेस्ट’चे १८ मार्ग नवी मुंबईत असून ‘बेस्ट’ची बस नवी मुंबई पालिका क्षेत्र व कळंबोलीपर्यंत सेवा देत आहे. यातील बहुतांश मार्ग हे ‘बेस्ट’ आणि ‘एनएमएमटी’च्या समांतर आहेत.

सद्य:स्थितीत ‘बेस्ट’पेक्षा ‘एनएमएमटी’चे तिकीट दर कमी असल्याने मुंबईतील मार्गावर ‘एनएमएमटी’ प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळत आहे. मुंबईत बोरिवली, मंत्रालय, बांद्रा, अधेरी, मुलुंड, ताडदेव या मार्गावर ‘एनएमएमटी’ची सेवा असून दररोज ११ लाखांचे उत्पन्न आहे. यात वातानुकूलित बसला चांगला प्रतिसाद मिळत असून दररोज ८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. ‘एनएमएमटी’च्या बसमधून दररोज सुमारे २० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामानाने ‘बेस्ट’चे मार्ग अधिक असूनही प्रवासी संख्या मात्र कमी आहे. उत्पन्नही सुमारे १४ लाखांच्या घरात आहे. ‘बेस्ट’च्या वातानुकूलित बस बंद कराव्या लागत असताना ‘एनएमएमटी’च्या वातानुकूलित बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बेस्टच्या दरकपातीनंतर मात्र ‘एनएमएमटी’ व ‘बेस्ट’ बसच्या भाडय़ात मोठी तफावत राहणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम एनएमएमटीच्या वातानुकूलित  बससेवेच्या प्रवासी संख्येवर होण्याची शक्यता आहे. वातानुकूलित बसमध्ये ‘बेस्ट’चे कमाल भाडे फक्त २५ रुपये तर ‘एनएमएमटी’चे ११५ रुपये असणार आहे. सध्या ‘बेस्ट’ची वातानुकूलित सेवा बंद असली तरी येत्या काळात या बस  भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्याचे परिणाम ‘एनएमएमटी’ वर दिसून येतील.

‘एनएमएमटी’चा सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणारा घणसोली ते वाशी रेल्वे स्थानक हा मार्ग क्रमांक ९ असून याचे तिकीट १३ रुपये आहे. तर ‘बेस्ट’ दहा रुपयेच घेणार आहे. हीच परिस्थिती नवी मुंबईतील इतर मार्गावरही असणार आहे.

* ‘एनएमएमटी’चे किमान भाडे  ७ रुपये तर ‘बेस्ट’चे ५ रुपये असेल.

* ‘एनएमएमटी’चे कमाल भाडे ४२, तर बेस्टचे फक्त २० रुपये असणार आहे.

* वातानुकूलित बसमध्ये ‘बेस्ट’चे कमाल भाडे फक्त २५ रुपये तर ‘एनएमएमटी’चे ११५ रुपये असणार आहे.

‘एनएमएमटी’ची सद्य:स्थिती

डिझेलचे दर ७८ ते ७९ रुपयांवर गेल्याने इंधनापोटीचा एनएमएमटीचा खर्च ४२ कोटींपर्यंत गेला आहे. त्यामुळे १३ कोटींचे बजेट वाढल्याने परिवहन उपक्रम आर्थिक संकटातून जात आहे. ६.५ कोटी वेतनावर, इंधनावर ३.२५ कोटी, ‘सीएनजी’साठी १.४५ कोटी, पेन्शन, सुरक्षा व साफसफाईवर १ कोटी, वार्षिक देखभाल दुरुस्तीवर तसेच इतर खर्च पाहता परिवहन उपक्रम नवी मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून आहे.

‘बेस्ट’ दरकपातीचा प्रस्ताव प्रत्यक्षात अमलात येण्यासाठी मोठा अवधी आहे. एवढय़ा कमी दरात सेवा परवडेल का? प्रत्यक्ष दर कपात अमलात आल्यावर नेमकी काय परिस्थित होईल? हे पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात परिवहन समिती आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

-शिरीष आरदवाड, व्यवस्थापक एनएमएमटी