रेल्वे तसेच बस आरक्षणबाबत निर्णय नाही

मुंबई : करोनाकाळात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना राज्य सरकारकडून अद्याप कोणतेच आश्वासन मिळालेले नाही. टाळेबंदीत रेल्वे तसेच राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ांचे आरक्षणबाबतचा निर्णय झालेला नाही.

त्यातच गावात प्रवेश करण्याआधी १४ दिवसांचे अलगीकरण करण्याच्या नियमामुळे गणेशभक्तांसमोरील पेच वाढला आहे. त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी कोकण प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

यात १४ ऐवजी सात दिवसांचे अलगीकरण आणि काही प्रमाणात मूळ भाडे आकारुन एसटी व रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात याव्यात असे या संघटनांचे म्हणणे आहे.

गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाचे (मुंबई) कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसमोर यंदा मोठी समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. त्यामुळे ८ जुलैला मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे पत्र पाठवल्याचे सांगितले.

कोकणात जाण्याआधी चाचणी के ल्यास कोणता संशयही राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनीही कोकणासाठी एसटी आणि काही प्रमाणात रेल्वे सोडण्याची मागणी केली आहे. एसटीच्या बसगाडय़ा प्रासंगिक कराराऐवजी मूळ भाडेदराने नियमित सोडण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘गट आरक्षण परवडण्याजोगे’

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी उपलब्ध करण्याचा निर्णय झालाच तर प्रासंगिक करारावर त्या देण्याचा विचार सुरु आहे. टाळेबंदीत एसटी गाडय़ा या ४४ ऐवजी २२ प्रवाशांसाठी उपलब्ध करुन प्रासंगिक करारावर देण्यात आल्या. यामुळे मात्र प्रवाशांना दुप्पट भाडे द्यावे लागले. गणेशोत्सवात तसे झाल्यास ते कोणालाही परवडणारे नाही. त्यामुळे मूळ भाडेदराने गट आरक्षण पद्धतीने गाडय़ा सोडल्यास ते प्रवाशांना परवडणारे ठरेल, असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

कोकणात जाणाऱ्यांसाठी अलगीकरणाचा कालावधी १४ च्या ऐवजी ७ दिवस करण्याची मागणी आयसीएमआरकडे शासनामार्फत करणार आहोत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चाही के ली जाईल.

-विनायक राऊत, खासदार, शिवसेना</strong>