‘हृदयेश फेस्टिवल’मध्ये ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचे आवाहन
आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत, संगीतक्षेत्रही त्यास अपवाद नाही; मात्र शास्त्रीय संगीतात कारकीर्द करू पाहणाऱ्या तरुण गायकांनी झटपट यशामागे धावू नये, असे यश फार काळ टिकत नाही, असे मनोगत जयपूर अत्रोली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका धोंडूताई कुलकर्णी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. लोकसत्ता आणि रिचा रिअल्टर्सची प्रस्तुती असलेल्या तेविसाव्या ‘हृदयेश फेस्टिवल’च्या समारोपाच्या दिवशी धोंडूताईंना ‘हृदयेश संगीत सेवाव्रती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
विलेपार्ले पूर्व येथील साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या महोत्सवात पार्ले टिळक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गानू यांच्या हस्ते धोंडूताईंचा सत्कार करण्यात आला. साडी, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी व्यासपीठावर संतूरवादक राहुल शर्मा, उस्ताद राशिद खान, विजय घाटे, अजय जोगळेकर, आशालता घैसास ट्रस्टच्या श्रीमती घैसास आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्या जाहिरातबाजी आणि मार्केटिंगचा काळ असल्याने संगीत क्षेत्रातही स्पर्धा वाढली आहे. मात्र यशस्वी गायक होण्यासाठी कोणताही शॉर्ट कट नसून कठोर परिश्रम आणि गायकीत अचूकता राखल्यास तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, असा सल्ला या ८३वर्षीय ज्येष्ठ गायिकेने दिला. जगातील अन्य संगीतप्रकारांपेक्षा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हे निसर्गसिद्ध आहे. या संगीताची परंपरा जी घराणी प्रामुख्याने चालवत आहेत, त्यातील एका घराण्याची ७५ वर्षे पाईक असल्याचा मला अभिमान आहे. अल्लादियाँ खाँसाहेबांची प्रज्ञा, प्रतिभा आणि परिश्रम याच्या मिलापातून जयपूर अत्रौली घराणे निर्माण झाले आहे. प्रत्येक घराण्याला स्वतंत्र वैशिष्टय़ असल्याने अनेक घराण्यांच्या गायकीच्या शैलीची सरमिसळ करून गाण्याच्या फंदात न पडता आपापल्या घराण्याचे गाणे पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शास्त्रीय गायन-वादनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कलाकाराला आमच्या संस्थेतर्फे ‘हृदयेश संगीत सेवाव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पं. यशवंतबुवा जोशी आणि बबनराव हळदणकर या ज्येष्ठांना हा पुरस्कार मिळाला आहे. यंदा धोंडूताईंसारख्या ज्येष्ठ गायिकेला हा पुरस्कार दिल्याचा आनंद मोठा आहे, असे मनोगत हृदयेश आर्ट्सचे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी व्यक्त केले.
या सत्कारापूर्वी या महोत्सवाच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाच्या सत्राची सुरुवात राहुल शर्मा यांच्या संतूरवादनाने झाली. हंसध्वनी हा राग विविध अंगाने सादर करताना त्यांनी दीड तास रसिकांना संमोहित केले. शास्त्रीय संगीतात संतूरला स्थान मिळवून देणारे पं. शिवकुमार शर्मा यांचा वारसा राहुल समर्थपणे पुढे नेत असल्याची साक्ष या रसिकांना पटली. सत्यजित तळवलकर यांनी त्यांना तबल्यावर उत्तम साथ केली.
महोत्सवाचा समारोप झाला तो सध्याचे आघाडीचे गायक उस्ताद राशिद खान यांच्या मैफलीने! ‘सध्याच्या पिढीतील आश्वासक स्वर’ असे ज्यांचे वर्णन खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी केले होते, त्या राशिद खान यांनी जोगकंस रागाद्वारे आपल्या मैफलीची सुरुवात केली. हा राग आळवल्यानंतर रसिकांनी केलेल्या फर्माईशीचा मान राखत त्यांनी ‘याद पिया की आए’ ही प्रसिद्ध ठुमरी प्रभावीपणे सादर केली. यानंतर भैरवी घेत त्यांनी महोत्सवाची सांगता केली. आनंद सिंग यांनी या महोत्सवाचे नेटके सूत्रसंचालन केले.