सध्या १९७८ ची नियमावली अमलात

उमाकांत देशपांडे, मुंबई</strong>

राज्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत १९७८ची सुरक्षा नियमावलीच अद्याप अमलात असून वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येणाऱ्या पावसाच्या अंदाजाशी त्याची कोणतीही सांगड नाही. धरणांमध्ये ८०-८५ टक्के पाणीसाठा झाल्यावरच विसर्ग करण्यात येत असल्याने अतिवृष्टीच्या वेळीच हे पाणी सोडले जाते आणि मोठे पूर येऊन प्रचंड नुकसान होत आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांमध्ये आलेल्या महापुरातून हेच दिसून आले आहे. त्यामुळे वेधशाळेचा अंदाज आणि उपग्रहाने घेतलेली ढगांची छायाचित्रे यानुसार धरणांमधून पाणी विसर्गाचा निर्णय घेता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त केली जाईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

धरणांमधून पाणी सोडून दिले आणि वेधशाळेच्या अंदाजानुसार पाऊस पडला नाही, तर पुढील वर्षी उन्हाळा संपेपर्यंत पाणी कसे पुरवायचे, हा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरणांमध्ये ८०-८५ टक्के पाणीसाठा झाल्याशिवाय पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जात नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. जलसंपदा विभागाने अतिवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन आधीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग न केल्याने अतिवृष्टी असताना पाणी सोडले गेले व महापूर आला, अशी तक्रार आहे, याबाबत  महाजन म्हणाले, २४ जुलै २००५ रोजी किंवा गेल्या आठवडय़ात सांगली-कोल्हापूरमध्ये जो विक्रमी पाऊस झाला, अशी परिस्थिती दरवर्षी नसते. ती ५० वर्षांत एखाद्याच वेळी निर्माण होते. त्यामुळे जलसंपदा विभागाने नियोजन केले नाही, असे नाही. पंचगंगेमध्ये व कोयनेत ३ ऑगस्टपासून विसर्ग सुरू झाला आणि काही दिवस दररोजचा पाऊसही २२४ ते ३५५ मिमीपर्यंत होता. कोयना धरणात आठ-दहा दिवसांत ५० टीएमसी पाणी जमा झाले. असाधारण किंवा विक्रमी पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. १-२ ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा ४० ते ६० टक्के इतकाच होता.

धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याबाबत १९७८ची सुरक्षा नियमावली आहे आणि त्यानुसार ८०-८५ टक्के पाणीसाठा झाल्यावर विसर्ग सुरू होतो. वेधशाळा केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असून अतिवृष्टीचा व पावसाचा अंदाज वर्तविणारे तंत्रज्ञानही आता अद्ययावत झाले आहे. मात्र जलसंपदा विभाग कधीही वेधशाळेच्या पावसाच्या अंदाजांनुसार विसर्गाबाबत निर्णय घेत नाही. परिणामी अतिवृष्टी होत असताना धरणांमधून पाण्याचा विसर्ग होऊन महापूर येतो, असे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येत आहे.

गेल्या आठवडय़ातील पाणीविसर्ग व पावसाची आकडेवारी

दिनांक   पंचगंगा  २४ तासांतील      कोयना विसर्ग      २४ तासांतील

                    विसर्ग    पाऊस              विसर्ग                        पाऊस

                  (क्युसेक्स)    (मिमी)     (क्युसेक्स)                 (मिमी)

३/८/१९    ६३२६९         २०४               ८८१९२                         २२४

४/८/१९    ६४२०१         २३४               १०७७४७                      ३५५

५/८/१९    ६६१६४         ३६४               १२७५७८                       ३०४

६/८/१९   ६९७५१          ४४५               १४०५५०                       २४८

७/८/१९   ७४६०८          ३२४               १२०५९९                       २५३