सौरभ कुलश्रेष्ठ

करोना रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे मंगळवारी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्यासह मीरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर अशा चार महापालिका आयुक्तांची एकाच दिवशी बदली झाली.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील एकूण ११ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई झाली. तर एकूण २२ अधिकाऱ्यांना त्यामुळे नियुक्तीच्या चक्रात जावे लागले. डॉ. विपीन शर्मा यांच्यावर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह २२ अधिकाऱ्यांच्या बदली-नियुक्तीला करोना कारणीभूत ठरला आहे.

मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात राज्यात करोनाचा शिरकाव झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांत एकूण ३६ सनदी अधिकारी-महापालिका आयुक्तांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. राज्य सरकारने १९ मार्च ते २५ मे या कालावधीत २१ अधिकाऱ्यांची बदली केली. ८ जूनला तीन जणांची बदली झाली. ९ जूनला दोघांची, २० जूनला तिघांची, २३ जूनला चौघांची बदली झाली. याशिवाय भिवंडी निजामपूरचे पालिका आयुक्त आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांच्या स्वतंत्र बदल्या झाल्या. अशारितीने एकूण ३४ सनदी अधिकारी-महापालिका आयुक्तांची बदली-नियुक्ती झाली. या प्रशासकीय बदल्यांमध्ये काही राजकीय हिशेबही चुकते होत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आता कोणाचा क्रमांक, अशी चर्चा सुरू झाली आहे.

करोना नियंत्रणात अपयशी ठरल्यामुळे बदलीची सुरुवात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्यापासून झाली. त्यांच्यासह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, जयश्री भोज यांचीही मुंबई महापालिकेतून बदली झाली होती. त्यानंतर सोलापूरचे आयुक्त दीपक तावरे, जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पनवलेचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख, भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त प्रवीण अष्टीकर यांना करोना नियंत्रित करता न आल्याने पदावरून दूर व्हावे लागले. गेल्या तीन महिन्यांत एकूण ११ प्रशासकीय अधिकाऱ्यांना करोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा फटका बसला आहे.

करोना परिस्थिती नियंत्रणाच्या जबाबदारीसह इक्बालसिंह चहल यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. त्यांना साथ देण्यासाठी संजीव जयस्वाल आणि अश्विनी भिडे यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नेमण्यात आले. सोलापूर महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी पी. शिवशंकर यांच्यावर टाकण्यात आली. जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची धुरा अभिजीत चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. पनवेलची जबाबदारी सुधाकर देशमुख यांच्यावर टाकण्यात आली. याशिवाय डिसेंबरपासून रिक्त असलेल्या वसई-विरार महापालिके च्या आयुक्तपदी डी. गंगाथरण यांची नियुक्ती एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात करण्यात आली होती. तसेच मुंबई महानगरप्रदेशातील महत्त्वाची नगरपरिषद असलेल्या अंबरनाथचे मुख्याधिकारी देवीदास पवार यांना करोना हाताळणीतील अपयशामुळेच बदलून त्यांच्या जागेवर श्रीधर पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे.

अपयशाचा ठपका

करोना नियंत्रणात अपयशी ठरल्याचा ठपका बसल्याने मंगळवारी ठाण्याचे पालिका आयुक्त विजय सिंघल, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, उल्हासनगरचे महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, मीरा-भाईंदरचे महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे या ठाणे जिल्ह्य़ातील चार महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली. आधी तीन बदल्या झाल्या होत्या. मात्र, रात्री उशिरा विजय सिंघल यांचीही सरकारने बदली केली.