साठेबाजांविरोधात राज्य सरकारने कारवाई सुरू करताच नाशिकमधील मुख्य बाजारात कांद्याचे भाव क्विंटलमागे तब्बल बाराशे रुपयांनी कोसळले. साठविलेला कांदा बाजारात आणला जाऊ लागल्याने अचानक आवक वाढल्याचा हा परिणाम होता. गेल्या आठवडय़ात पाच हजार रूपयांपर्यंत पोहोचलेले भाव अचानक घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
‘मागणी अधिक आणि आवक कमी’ यामुळे महिन्यापासून कांदा भाव नवनवीन उच्चांक प्रस्थापित करत असताना सोमवारी त्यास धक्का बसला. केंद्र व राज्य शासनाने कांद्याची साठवणूक करणाऱ्यांवर छापे टाकण्याचा इशारा दिल्यामुळे देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या नाशिकमध्ये धास्तावलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपल्याकडे शिल्लक असणारा कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्याचा सपाटा लावल्याचे पहावयास मिळाले. त्याचा विपरित परिणाम भावावर झाला. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवडय़ात प्रतिक्विंटल ४,८१५ रूपयांवर असणारा कांद्याचा सरासरी भाव या दिवशी ३,६१६ रूपयांपर्यंत खाली आला. सटाण्यात ३,७६० तर मनमाडमध्ये हा भाव ३३५० रूपयांपर्यंत घसरला.  इतर बाजार समित्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. सटाण्यात संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत मालेगाव, देवळा व विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील वाहतूक बंद पाडली. शासनाने निर्माण केलेल्या भीतीदायक वातावरणाने ही स्थिती निर्माण झाल्याची तक्रार लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली.
मुंबईत ३८ रुपये किलो
नाशिक तसेच पुण्याच्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर कांदा आल्याने तेथेही दरात कपात झाली आणि मुंबईच्या बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे ३८ रुपयांपर्यत खाली घसरला. अव्वाच्या सव्वा दर वाढल्यामुळे इतके दिवस खरेदीकडे दुर्लक्ष करणाऱ्या काही मोठय़ा निर्यातदारांनी नाशिक बाजारात मोठय़ा प्रमाणावर खरेदी केल्याची चर्चा असून यामुळे कांदा आणखी स्वस्त होण्याची शक्यता आजपुरती का होईना मावळल्याचे बोलले जात आहे.