मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये संदिग्धता

एमबीबीएस व बीडीएससाठी या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकरिता ‘केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा’कडून (सीबीएसई) घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेकरिता (नीट) यंदापासून विविध शिक्षण मंडळातून खासगीरीत्या व राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थांमधून बारावी झालेले विद्यार्थी अपात्र असणार आहेत. भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) या निर्णयाला मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून विरोध होत असून त्याचा पुनर्विचार करावा, असे केंद्रीय आरोग्य विभागाने परिषदेला सुचविलेले आहे. मात्र यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय परिषदेने दिलेला नसल्याने या नियमावलीमुळे नीटच्या परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संदिग्धता आहे.

राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थांमधून किंवा विविध केंद्रीय व शिक्षण मंडळांमधून खासगीरीत्या बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यंदाच्या नीट परीक्षेसाठी अपात्र असल्याचे एमसीआयने जानेवारीमध्ये अधिसूचना काढून जाहीर केले. मात्र हा निर्णय एमसीआयने आयत्या वेळी जाहीर केल्यामुळे मुक्त विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या आणि नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा फटका बसणार आहे. यामुळे विद्यार्थी वर्गामधून नाराजी व्यक्त होत असून मुक्त विद्यापीठांकडून या निर्णयाला विरोध होत आहे. अनेकदा विद्यार्थी नीट किंवा तत्सम केंद्रीय प्रवेश परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी बारावीची परीक्षा खासगीरीत्या देतात. त्यांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना सीबीएसईने मान्यता दिली असून ही संस्था इतर शिक्षण मंडळांच्या समान असल्याचेही स्वीकारले आहे. त्यामुळे एमसीआयने मुक्त विद्यापीठ संदर्भातल्या या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्य विभागाने एमसीआयकडे केली आहे. मात्र याबाबत एमसीआयने अद्याप कोणताही निर्णय न दिल्याने नीट परीक्षेसाठी अर्ज करायचा की नाही, अशा गोंधळात विद्यार्थी आहेत.