News Flash

पुढील पाच दिवसांत राज्याला प्राणवायू 

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखपट्टणमला रवाना

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोनाबाधितांवर उपचार करताना प्राणवायूचा तुटवडा भासू नये आणि तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावा याकरिता रेल्वेची ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सोमवारी विशाखापट्टणमच्या दिशेने रवाना झाली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ही विशेष गाडी कळंबोली येथील माल धक्क्यावरून विशाखापट्टणमला रवाना झाली. सात टँकर घेऊन गेलेल्या या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’मधून  सुमारे १०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणला जाणार आहे.

राज्यातील प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. त्यामुळेच सरकारने द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) रेल्वेने नेता येऊ शकेल का याची विचारणा रेल्वेकडे केली होती. त्याला प्रतिसाद देऊन मध्य रेल्वेने कळंबोली ते विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो असा सुलभ मार्ग (ग्रीन कॉरिडॉर) तयार केला आहे. कळंबोली येथून सोमवारी (१९ एप्रिल) विशाखापट्टणमच्या दिशेने पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस सात टँकरमधून प्राणवायू भरून घेऊन राज्यात परतेल. पुढील पाच दिवसांत ही रेल्वे प्राणवायूने भरलेले टँकर घेऊन येईल, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

समतल (फ्लट) वॅगनवर ठेवलेल्या रोड टँकरसह ‘रोल ऑन रोल ऑफ‘ (रो रो) सेवेद्वारे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे. पुलांवरील रस्ते आणि ओव्हर हेड यंत्रणेमुळे रेल्वे वॅगनवर टँकर एका विशिष्ट उंचीचे टँकर  ठेवावे लागणार होते. त्यामुळे या मर्यादित उंचीचे टँकर मिळवण्यासाठी परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी दिवसभर धावपळ सुरू होती.

टँकर ओव्हरहेड वायर आणि बोगदे लागणार नाहीत यासाठी मध्य रेल्वेचे कर्मचारी खबरदारी बाळगत होते. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई, सोलापूर मार्गे पुढे विशाखापट्टणम कडे जाणाऱ्या मार्गावरील घाट रस्त्याचा अडथळा वाहतुकीत येऊन नये यासाठी मध्य रेल्वेने थोडे अधिक अंतर असलेला मात्र सुरक्षित असा मार्ग निवडला आहे. त्यामुळे ही रेल्वे कळंबोली येथून पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानक येथून पुढे जळगाव, नागपूर, भिलाई, रायपूर येथून विशाखाट्टणमला जाणार आहे. पुढील दोन दिवसांत ही गाडी विशाखापट्टणम येथे पोहचेल. त्यानंतर साधारणत: ८ तासांत टँकर ऑक्सिजन भरून  विशाखाट्टणम येथील रेल्वे यार्डमध्ये परततील. त्यानंतर गाडीचा परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वॅगनवर टँकर सुरक्षितपणे बसवण्यासाठी रेल्वे कर्मचारी दिवसभर काम करत होते. प्रवासात टँकर हलू नये याकरिता १६ एमएमच्या तारेने हे टँकर बांधण्यात आले आहेत. सुमारे २० कर्मचारी त्यासाठी कार्यरत होते. तर रेल्वेचे अन्य काही कर्मचारी वॅगनचे मोजमाप घेण्यात व्यस्त होते.

रेल्वे वॅगनवर टँकर ठेवण्यासाठी आणि उतरविण्यासाठी विशाखापट्टणम. अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प बांधण्याचे काम सुरू आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस या ठिकाणी पोहचण्यापूर्वी हे कार्य पूर्ण केले जाणार आहे.

ऑर्गन आणि नायट्रोजन वायू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरमधून प्राणवायूची वाहतूक करता येईल, अशा पद्धतीने परिवहन विभागाने या टँकरमध्ये बदल के ले आहेत. जवळपास ५० टँकर परिवहन विभागाने रूपांतरित करून घेतले आहेत. संबंधित कंपन्यांकडून या गाड्या रूपांतरित करून घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली. यातील सात टँकर विशाखाट्टणमसाठी रवाना झाले आहेत. या प्रत्येक टँकरबरोबर दोन व्यक्ती पाठवण्यात आल्या असून या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने एक विशेष बोगी रेल्वे गाडीला जोडली आहे. लष्कराचे साहित्य, ट्रक यांची वाहतूक करण्यासाठी वापरली जाणाऱ्या वॅगनने प्राणवायू सिलिंडरची वाहतूक केली जाणार आहे.

टँकर मिळविण्यासाठी धावपळ.

ओव्हरहेड वायर वायर आणि वॅगनवरील टँकर यांच्यामध्ये ३०० मिमी अंतर आवश्यक असते. त्यामुळे विविध आकाराच्या रस्ते टँकरपैकी ३३२० एमएम उंची असलेले टी १६१८ मॉडेलचे टँकर १२९० मिमी उंची असलेल्या समतल वॅगनवर ठेवले आहेत. मात्र एक टँकर अपेक्षित उंचीपेक्षा २१५ सेंटिमीटर मोठा होता. त्यामुळे वॅगनवर चढवलेला टँकर खाली उतरवावा लागला. परिवहन विभागाने निश्चित केलेल्या १० टँकर पैकी ४ टँकरची उंची अधिक असल्याने ते माघारी पाठवावे लागले.  परिणामी एनवेळी परिवहन विभागाला इतर टँकरची शोधाशोध करावी लागली. मात्र ऑक्सिजन टँकर खाली नसल्याने अखेर ८ टँकरच विशाखापट्टणमसाठी रवाना झाले. यातील अनेक टँकर हे वाहतुकीत व्यस्त असल्याने परिवहन विभागाला त्यांचे मोजमाप करता येऊ शकले नाही, अशी माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

‘‘कंपनीने सकाळी कळंबोली येथील कारखान्यात गाडी घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा हा टँकर नक्की कुठे पाठवला जाणार आहे याबाबत काहीच माहिती नव्हती. कळंबोली येथे आल्यानंतर टँकर कु ठे पाठवला जाणार आहे हे कळाले’’, असे संतोष पाल या टँकर चालकाने  सांगितले.

रेल्वे नियंत्रण कक्षातून देखरेख

रेल्वेच्या मुख्य नियंत्रण कक्षातून या रेल्वेच्या प्रवासावर देखरेख ठेवली जाईल. या ऑक्सिजन एक्स्पे्रससाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विनाअडथळा आणि जलदगतीने प्रवास करू शकेल.

आवश्यक त्या ठिकाणांहून प्राणवायू आणला जाईल आणि राज्यातील प्राणवायूचा तुटवडा दूर के ला जाईल. यापुढेही रेल्वे वॅगनवरून छोटे आणि अधिक टँकर पाठवले जातील. ज्या जिल्ह्यात  प्राणवायूची गरज अधिक आहे तिथे आरोग्य विभागाच्या  सांगण्यानुसार प्राणवायूचे सिलेंडर पोहचवले जातील. प्राणवायू सिलेंडर पोहचविण्यासाठी रस्ते मार्गावर ग्रीन कॉरिडॉरची आवश्यकता भासल्यास तोही तयार के ला जाईल.

-अनिल परब, परिवहन मंत्री, महाराष्ट्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:54 am

Web Title: oxygen to the state in the next five days abn 97
Next Stories
1 दिवसभरात ३५ पोलीस बाधित
2 एनआयए पथक मनसुख हिरेन यांच्या निवासस्थानी
3 करोना रुग्णांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांची ‘हेल्पलाईन’
Just Now!
X