‘मेस्मा’ला स्थगिती देण्यावरून मतभेद

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’च्या कक्षेत आणण्याबाबत राज्य सरकारच्या वतीने आधी ठाम भूमिका मांडल्यानंतर सभागृह सुरू राहावे याकारणासाठी त्या भूमिकेला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरून राज्य सरकारमध्ये दरी पडली असून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नाराज झाल्या आहेत. फेसबुकवर ‘बाबा तुमची आठवण येते’ अशा आशयाची पोस्ट टाकून पंकजा मुंडे गुरुवारी दिवसभर विधिमंडळात गैरहजर राहिल्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या अखत्यारित आणल्यावरून शिवसेनेने व राष्ट्रवादी कॉंग्रेसने बुधवारी सभागृह बंद पाडले. मेस्माचा निर्णय रद्द केल्याशिवाय सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा सरकारमध्ये भागीदार असलेल्या शिवसेनेने घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्माच्या निर्णयाला स्थगिती देत त्यावर तोडगा काढण्याचे ठरवले. त्याबाबतची घोषणा गुरुवारी सकाळीच सभागृहात करण्याचे ठरवले. मात्र पंकजा यांना मुख्यमंत्र्यांचा निर्णय पसंत पडला नाही.

गेले दोन दिवस मेस्मावरून पंकजा मुंडे सभागृहात ठाम भूमिका घेत होत्या. उच्च न्यायालयातील याचिकेवरूनच विधि व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मेस्माच्या अखत्यारित आणण्याचा निर्णय झाल्याचे त्या सांगत होत्या. मात्र आता अचानक घूमजाव का करायचे असा त्यांचा प्रश्न होता. त्याचबरोबर आपल्याला तोंडघशी पाडण्यात येत असल्याचीही त्यांची भावना झाली. त्यामुळे पंकजा यांनी सरकारच्या या माघारीशी आपण सहमत नाही हे दाखवून देण्यासाठी गुरुवारी विधान भवनात न येणे पसंत केले. फेसबुकवर  वडील गोपीनाथ मुंडे यांचे छायाचित्र टाकून, ‘बाबा..’ अशी पोस्ट टाकली. त्याचबरोबर ‘तुमच्या नसण्याची मला कायम जाणीव होते’ अशा आशयाचा संदेश असलेले चित्रही त्याबरोबर टाकले.  पंकजा मुंडे यांच्या खात्याच्या अंगणवाडी पोषण आहारासाठी पुरेसा निधी मिळत नसल्याबाबत आणि महिला उद्योजक धोरणाबाबत अशा दोन बैठका विधान भवनात होत्या. तरीही त्या विधान भवनाकडे फिरकल्या नाहीत.

नाराजीचा प्रश्नच नाही- पंकजा मुंडे

मेस्माला स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही. उलट माझ्या खात्याचे निवेदन करून त्यांनी मला एकप्रकारे मदतच केली आहे असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.