बहीण-भावामधील संघर्ष अधिक तीव्र

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. विधान परिषदेतील प्रश्नाबाबतच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या धनंजय मुंडे यांनी आज सरकारला थेट आव्हान देत दररोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीडी सभागृहात सादर करण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे याच्या स्वीय सहाय्यकावरील आरोपांबाबतची एक सीडी सभागृहात सादर केली. त्यामुळे मुंडे भावंडामधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांबाबत सभागृहात खुलासा करताना मुंडे यांनी आक्रमकपणे सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या तीन वर्षांत सरकारमधील मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानेआणि दिवसांपूर्वी सरसघंचालकांवरही टीका केल्याने केवळ बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी त्यांनी मंत्री आणि काही खात्यांमधील भ्रष्टाचार उघड करणार असल्याचे सांगत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे परळीतील स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींकडून सुचवण्यात येणाऱ्या कामात पैसे मागितल्याबातची कथित ऑडिओ टेप सादर केली. त्यावर ही सीडी बनावट असून आपल्या स्वीय सहाय्यकाने त्याबाबच स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. या सीडीतील आवाज कुलकर्णी यांचा नसून कोणीतरी बनावट सीडी तयार केली आहे. यामागे कोण आहे याची चौकशी करावी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्ष नेत्यांनी ही सीडी कुठून मिळाली ते सांगितल्यास प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल, असेही त्यांनी सांगितले

ध्वनिफितप्रकरणी गुन्हा

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी यवतमाळ येथील व्यक्तीस ५० लाख रुपयांची लाच मागितल्याची ध्वनिफित विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सादर केल्यानंतर ती समाजमाध्यमात फिरली. हा प्रकार मंत्री पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा घाट असल्याचे सांगत प्रदीप कुलकर्णी यांनी तशी तक्रार परळी पोलीस ठाण्यात दिली.