अंधेरी, बोरिवली, ठाणे, कुल्र्यात दररोज सरासरी २० हजार तिकिटांची विक्री

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्यापासून मुंबईतील उपनगरी मार्गावरील महत्त्वाची स्थानके प्रवाशांच्या गर्दीने ओसंडू लागली आहेत. या स्थानकांतून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. अंधेरी, बोरिवली, ठाणे तसेच कुर्ला या स्थानकांतून दररोज सरासरी २० हजारांहून अधिक तिकिटांची विक्री होत असून पासधारक प्रवासी व उतारू यांचा विचार करता ही संख्या कितीतरी पट अधिक असण्याची शक्यता आहे.

मध्य व पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत १ फे ब्रुवारीनंतर जवळपास १७ ते १८ लाख प्रवाशांची भर पडली. परिणामी दररोज प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३७ लाखांपेक्षाही अधिक पोहोचली. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, दादर, कांदिवली आणि मध्य रेल्वेवरील ठाणे, कु र्ला, घाटकोपर, कल्याण, दिवा, डोंबिवली, मानखुर्द, पनवेल, दादर आदी स्थानकांवरुन आता मोठ्या संख्येने प्रवाशी मार्गस्थ होऊ लागले आहेत. या स्थानकात तिकीट काढण्यासाठी प्रवाशी मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागले आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी स्थानकातून सर्वाधिक २५ ते २७ हजार तिकीट विक्री होत असून ९०० ते हजार पासची विक्रीही होत आहे. बोरिवली स्थानकातून १८ ते २१ हजार प्रवासी दररोज तिकीट काढत असून ५०० ते ७०० पास विक्री होत आहे. ठाणे स्थानकातून सोमवारी ३० हजार २४० तिकीट विक्री आणि कुर्ला स्थानकातून २९ हजार २२३, त्यापाठोपाठ घाटकोपर स्थानकातून १८ हजार २०० आणि मानखुर्द स्थानकातून १८ हजार ३०० तिकीटांची विक्री झाली आहे.